पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सीएनजी पंपांची संख्या वाढविण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीएनजीच्या प्रश्नावर नुकत्याच झालेल्या बैठकीत रिक्षाचालकांना दिले.
शहरात सीएनजी पुरवठय़ाबाबत अनेक दिवसांपासूनची समस्या आहे. पंपांची संख्या कमी असल्याने सीएनजी भरण्यासाठी रिक्षा चालकांना बहुतांश वेळ रांगेत घालवावा लागतो. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होतो. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीनेही अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न मांडले. त्यावेळी शहरात सीएनजी पंपांची संख्या वाढविण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे, जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, नूरमहंमद रंगरेजा, चंद्रकांत गोडबोले, अशोक साळेकर, यासीन सय्यद, बापू धुमाळ, पोपट कांबळे, विजय रवळे आदी त्या वेळी उपस्थित होते.
शहरातील पेट्रोल पंपांना सीएनजीच्या कमिशनमध्ये साठ पैशावरून एक रुपया वीस पैसे वाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक पेट्रोल पंपावर सीएनजी उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे पंपावरील रिक्षाच्या रांगा कमी होऊन सर्व रिक्षाचालकांना वेळेत गॅस उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास बाबा कांबळे यांनी व्यक्त केला. पुणे व िपपरी-चिंचवड शहरामध्ये सध्या सीएनजीचे २३ पंप सुरू आहेत. लवकरच त्यामध्ये वाढ करून २७ नवे पंप सुरू करण्यात येतील, असे महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. गोसाई यांनी सांगितले. कात्रज डेपो व िपपरी-चिंचवडमध्ये निगडी येथील भक्ती-शक्ती येथी बस डेपोमध्येही सीएनजी पंप सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीमध्ये उपमुख्यमंत्र्यांना रिक्षाचालकांच्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.