“सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली आग आटोक्यात आलेली आहे. घटनास्थळी सीरमचे वरिष्ठ अधिकारी, पुणे शहारचे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी सध्या देखील आहेत. मी व स्थानिक आमदार चेतन तुपे आम्ही तिथं पाहणी केली. आग नक्की कशामुळे लागले हे अद्याप कुणीही सांगू शकत नाही. उद्या विविध पथकं येऊन घटनास्थळाची पाहणी करतील व त्यानंतरच आगीत किती जीवितहानी झाली हे कळेल.” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. सीरम इन्स्टिट्यूच्या ज्या इमारतीमध्ये आग लागली त्या घटनास्थळास भेट देऊन पाहणी केल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

यावेळी अजित पवार यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, “सुरूवातीस असं सांगण्यात आलं होतं की कुठलीही जीवितहानी झालेली नाही. त्याचं कारण असं होतं की, सीरम इन्स्टिट्यूटमध्ये जे अधिकारी, कर्मचारी व कामगार काम करत होते. ते सर्वजण बाहेर आले आहेत, असं लक्षात आलं होतं. त्यामुळे असं वाटलं होतं की कुठलीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, त्या ठिकाणी काम सुरू होतं. ठेकेदाराची लोकं तिथं काम करत होते. नंतर, आग विझवत असताना जेव्हा अग्निशमन दलाचे कर्मचारी तिथं पोहचले तेव्हा त्यांना पाच मृतदेह आढळून आले. हे पाचही मृतदेह संपूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आहेत. मृतांपैकी दोनजण पुण्यातील आहेत, दोनजण उत्तर प्रदेशचे आहेत व अन्य एकजण बिहारचा आहे. मृतांमधील पाचही जण पुरूष असल्याचे प्राथमिक माहितीमधून समजले आहे. पाच पेक्षा अधिक मृत्यू झालेले नाही, असा ९९ टक्के अंदाज आहे. आपण १०० टक्के यासाठी म्हणत नाही कारण, आता तिथं अंधार आहे, सर्व दिवे बंद आहेत. अजूनही तिथं धूर आहे. हा धूर पूर्णपणे बाहेर कसा निघेल यासाठी अग्निशमन विभाग प्रयत्न करत आहे. तसेच, उद्या मुख्यमंत्री देखील घटनास्थळास भेट देणार आहेत, करोना वॅक्सीन ज्या ठिकाणी बनवलं जात, त्या ठिकाणचं काहीही नुकसान झालेलं नाही.”असं देखील यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.

तसेच, या घटनेबाबत घातपात असल्याचे बोलले जात आहे. या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “भाजपच्या एका नेत्यांनी येथील घटनेवर प्रश्न निर्माण केला आहे. आपल्याकडे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. पण एक सांगातो की, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती नुसार वेगवेगळी मत व्यक्त करू शकतात. मात्र येथील घटनेची शहानिशा राज्य सरकारच्या विविध यंत्रणे मार्फत केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने घाबरून जावू नये.”

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या इमारतीला भेट दिली होती. त्यावर अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी येथील इमारतीच्या खालच्या मजल्यावर भेट दिली होती. भेट दिलेल्या ठिकाणावरील काम झाले होते आणि ही घटना तिसर्‍या मजल्यावर घडली आहे.

“वेल्डिंगचा एक स्पार्क ठरला आगीस कारणीभूत, ज्वलनशील पदार्थांमुळे अधिक भडकली”

दरम्यान, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती या अगोदर आरोग्यमंत्री राजेश टोपे व  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना दिलेली आहे.