शासनाच्या नियमानुसार शाळांमध्ये सुरू झालेला मूल्यशिक्षणाचा तास आता बहुतेक शाळांनी ‘ऑफ’ केला आहे. इंग्रजी माध्यमाच्या बहुतेक शाळांमध्ये राष्ट्रगीत झाले की नेहमीचे तास सुरू होतात. नियमित विषयांच्या वेळापत्रकाचे गणित सांभाळताना शाळांनी परिपाठ हद्दपार करणे पसंत केले आहे.
राज्यातील शाळांमध्ये मूल्यशिक्षण हे स्वतंत्र विषय म्हणून बंधनकारक करण्यात आले. नव्या अभ्यासक्रम आराखडय़ानुसार मूल्यशिक्षणाचा समावेश शाळांच्या नियमित अभ्यासक्रमांत करण्यात आला. मात्र, रोज शाळा भरताना सुरूवातीचा तास हा मूल्यशिक्षणाचा किंवा परिपाठाचा असावा, अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा यांबरोबरच संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचनही परिपाठाला करण्यात यावे, असा आदेशही शासनाने गेल्यावर्षी काढला होता. तसेच शाळा सुटताना ‘वंदे मातरम’ म्हणण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आता बहुतेक शाळांनी रोजच्या परिपाठाचा उपक्रम बंद केला आहे.
बहुतेक शाळांमध्ये राष्ट्रगीताने शाळेची सुरूवात होते. मात्र, त्यानंतर लगेचच नियमित तास सुरू होतात. शाळेचे नियमित विषय, शारिरीक शिक्षण किंवा खेळ, कार्यानुभव, पर्यावरण, संगणक आणि इतर उपक्रम हे सर्व वेळापत्रकांत बसवताना शाळांनी परिपाठाचा तास ‘ऑफ’ करून टाकला आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये परिपाठ अजूनही होत असला, तरी बहुतेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी परिपाठाचा उपक्रम बंदच केला आहे. काही अल्पसंख्याक शाळांमध्ये मात्र, शाळेची सुरूवात परिपाठाने आणि प्रार्थनेने केली जाते.
याबाबत एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षिकांनी सांगितले, ‘परिपाठाची संकल्पना चांगली असली, तरी शाळेत मुळात शिकवलय़ा जाणाऱ्या विषयांच्या वेळापत्रकात मूल्यशिक्षणासाठी स्वतंत्र वेळ देणे शक्य होत नाही. मुलांवरील अभ्यासाचा ताण आणि स्पर्धाही दिवसेंदिवस वाढते आहे. नियमित परीक्षा नसल्या, तरी वर्षभर विविध स्पर्धा परीक्षा सुरू असताता, त्यांच्या तयारीसाठीही वेळ द्यावा लागतो. सध्या शाळेची जी वेळ असते, त्यांत अजून वाढ करणेही अशक्यच आहे. त्यामुळे परिपाठासाठी स्वतंत्र वेळ ठेवला जात नाही. मात्र, नेहमीच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मूल्यशिक्षण करणे हेच जास्त योग्य ठरते.’