पुण्याच्या बुधवार पेठेतील लक्ष्मी रोडवर गणपती चौक मित्र मंडळातर्फे रस्त्याची अडवणूक करून उभारण्यात येणाऱ्या उत्सव मंडपाला पुढील वर्षी परवानगी देऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी पालिकेला देत मंडळाला दणका दिला.

मंडपाच्या नावाखाली शौचालयासाठी असलेल्या जागेवर मंडळाने अतिक्रमण केल्याचा आरोप पोपटलाल नवलखा यांनी केला आहे. तसेच या मंडपाविरोधात याचिका केली आहे. २००९ पासून गणेशोत्सवादरम्यान गणेशमूर्ती रस्त्यावर भलेमोठे मंडप उभारले जाते. परिणामी रस्ता पूर्णपणे अडवला जातो. एवढेच नव्हे, तर या रस्त्यावर गाडय़ा उभ्या करण्यासही मनाई आहे. मात्र त्यानंतरही मंडळाच्या सदस्यांच्या गाडय़ा तेथे सर्रास उभ्या केल्या जातात. शिवाय रस्त्यावर फेरीवाल्यांचाही या काळात सुळसुळाट असतो, असा दावाही याचिकेत करण्यात आलेला आहे.
न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळेस वारंवार आदेश देऊनही गणेशोत्सवात मंडळातर्फे रस्त्याची अडवणूक करणारे मंडप व त्याच्यावरची कमान हटविण्यात आली नाही. उलट न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ते हटविण्यात आले. मात्र पुन्हा एकदा नियमांना बगल देऊन बांधण्यात आले, याबाबत न्यायालयाने संताप व्यक्त केला. तसेच काही दुर्घटना घडली तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते याकडे लक्ष वेधले.