नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचाही वाटा; विनाअडथळा विजेची अपेक्षा

विजेचा पुरवठा करताना होणारी गळती आणि चोरी रोखण्याबरोबरच प्रामाणिकपणे नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या जोरावर पुणे विभागाने वीजहानी कमी ठेवण्यात यंदाही राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. राज्यातील सोळा विभागांची सरासरी वीजहानीची टक्केवारी १४.६८ आहे. मात्र, पुणे विभागाचे वीजहानीचे प्रमाण ९.०८ टक्के इतकेच आहे. इतर अनेक विभागातील वीजहानी २० टक्क्यांच्याही पुढे आहे. हा टप्पा गाठण्यात पुणेकर ग्राहकांचेही योगदान मोठे असल्याने या प्रामाणिक ग्राहकांना विनाअडथळा चोवीस तास वीज मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रत्यक्ष पुरविलेली वीज आणि त्याचा मिळालेला मोबदला यात येणारा फरक हा वीज वितरण हानी समजली जाते. महावितरण कंपनीच्या वितरण व्यवस्थेतील गळती आणि वीजचोरी यामुळे वीजहानी निर्माण होत असते. वीजहानी कमी करण्याबाबत थेट राज्य वीज नियामक आयोगानेच काही वर्षांपूर्वी आदेश दिल्यानंतर हानी कमी करण्याबाबत राज्यभर विविध प्रकारे प्रयत्न करण्यात आले. मीटर वाचनातील अनियमितता शोधण्यासाठी पथकाची स्थापना, वीजचोरी रोखण्याच्या दृष्टीने राज्यभरात भरारी पथके आणि स्वतंत्र पोलीस ठाण्यांची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून वीजचोरीच्या विरोधात मोहिमा राबविण्यात आल्या. वीज वितरणातील घट शोधण्यावरही भर देण्यात आला असून, वितरण रोहित्रांना त्याचप्रमाणे फिडरवरही मीटर बसविण्यात आले. त्यातून विजेचा हिशेब ठेवणे शक्य झाले.

पुणे विभागातही गळती कमी करणे आणि वीजचोरी रोखण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या. त्याचप्रमाणे थकीत बिलांच्या वसुलीसाठी मोहिमा राबविण्यात आल्या. पुणे विभागात सुरुवातीपासूनच नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच या विभागातून सर्वात कमी वीजहानी होत असल्याने बहुतांश भाग महावितरण कंपनीच्या सर्वोच्च ‘ए-वन’ गटात समाविष्ट केला आहे. २०१५मध्ये पुणे विभागाची वीजहानी ९.६१ टक्क्यांवर होती. २०१६ मध्ये ती ९.०५ टक्क्यांवर आली. सध्या त्यात किंचितशी वाढ होऊन ९.०८ झाली असली, तरी राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत कमी आहे.

महावितरण कंपनीकडून सध्या पुणे विभागात शून्य थकबाकीची मोहीम राबविण्यात येत आहे. वीजबिल थकल्यावर वीजपुरवठा तोडण्याची कारवाई करण्यात येत आहे. त्यातून वीजहानी आणखी कमी होऊ शकेल. पुणे विभागापाठोपाठ नागपूर परिमंडलात सर्वात कमी म्हणजे ९. ६३ टक्के वीजहानी आहे. राज्यात सर्वाधिक वीजहानी नांदेड परिमंडलात असून, ती २५. ५६ टक्के आहे. जळगाव, अकोला, औरंगाबाद, अमरावती, लातूर आदी परिमंडलात मोठय़ा प्रमाणावर वीजहानी आहे.

विभागानुसार वीज वितरण हानीची टक्केवारी

पुणे (९.०८), नागपूर (९.६३), कल्याण (९.८९), चंद्रपूर (११.१४), कोल्हापूर (१२.००), बारामती (१३.३४), कोकण (१४.४८), भांडूप (१४.७५), गोंदिया (१६.१३), औरंगाबाद (१६.५१), नाशिक (१६.९२), अमरावती (१६.९९), लातूर (२१.६६), अकोला (२२.५४), जळगाव (२२.६७), नांदेड (२२.५६).