लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सावध पवित्रा घेत पीएमपीची प्रस्तावित दरवाढ गुरुवारी फेटाळून लावली. पीएमपी प्रशासनाने पंचवीस टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव संचालक मंडळापुढे ठेवला होता. संचालक मंडळाने हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे बारा लाख प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत महापौर चंचला कोद्रे, पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे, मंडळाचे सदस्य प्रशांत जगताप आणि अन्य अधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती. डिझेल तसेच सुटय़ा भागांच्या दरातील वाढीमुळे पीएमपीच्या भाडेदरात पंचवीस टक्के वाढीचा प्रस्ताव बैठकीत चर्चेसाठी आल्यानंतर त्याला संचालकांनी विरोध केला. भाडेदरात काही महिन्यांपूर्वीच वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा दरवाढ करणे योग्य ठरणार नाही, असा सूर बैठकीत उमटला.
लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि आगामी विधानसभेच्या निवडणुका यांचा विचार करता दरवाढीचा फटका सत्ताधारी पक्षाला बसू शकतो. पुणे आणि पिंपरी महापालिकेत काँग्रस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. अशा परिस्थितीत दरवाढ केली तर पुणेकर माफ करणार नाहीत. त्यामुळे आता तर भाडेवाढ नकोच, असे संचालकांनी सांगितले. त्यामुळे भाडेवाढीचा प्रस्ताव एकमताने फेटाळण्यात आला.
पीएमपीच्या गाडय़ा पुणे व पिंपरीत सेवा देत असल्या, तरी विधानसभा मतदारसंघांचा विचार करता या गाडय़ा शहर व जिल्ह्य़ातील सतरा विधानसभा मतदारसंघांमध्ये जातात. सध्या या सेवेचा लाभ रोज तेरा लाख प्रवासी घेत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत दरवाढ केल्यास त्याचा फटका येणाऱ्या निवडणुकीत बसू शकतो, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले. दरवाढ करावी किंवा कसे याबाबत संचालकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा केली व त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात आला.
पाचशे गाडय़ा नव्याने घेणार
केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून पीएमपीसाठी पाचशे नव्या गाडय़ांची खरेदी करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या खरेदीसाठी केंद्र व राज्य शासन मिळून सत्तर टक्के अनुदान मिळणार आहे, तर पुणे व पिंपरीने तीस टक्के निधी उभा करायचा आहे. त्यादृष्टीने दोन्ही महापालिका आयुक्तांकडून अभिप्राय मागवण्यात येणार आहे. त्यानंतर खरेदीचा आदेश काढला जाईल. पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या आणि सात वर्षे ताफ्यात असलेल्या गाडय़ा बाद कराव्यात असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बीआरटीसाठी बोधचिन्हाची निश्चिती
पुणे आणि पिंपरीत सुरू असलेल्या बीआरटी प्रकल्पाची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी यासाठी या प्रकल्पाला बोधचिन्ह देण्याचा प्रस्ताव पीएमपीने मंजूर केला आहे. त्यासाठी आलेल्या नमुन्यांमधून ‘रेनबो’ हे बोधचिन्ह निश्चित करण्यात आले असून बीआरटी प्रकल्पासाठी स्वतंत्र कक्षही स्थापन केला जाणार आहे.