शहरातील बंदोबस्त कायम; नदीपात्रात पोलिसांची गस्त

पुणे : यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने वैभवशाली परंपरा असलेला पुण्यातील विसर्जन मिरवणूक सोहळा खंडित करण्यात आला आहे. दिमाखदार विसर्जन मिरवणूक सोहळा यंदा पार पडणार नसला तरी विसर्जनाच्या दिवशी शहरात ठेवण्यात येणारा बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे.

दिमाखदार विसर्जन सोहळा पाहण्यासाठी पुण्यातूनच नव्हे, तर देशाच्या वेगवेगळ्या भागातून भाविक आवर्जून हजेरी लावतात. गेल्या काही वर्षांत शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी परदेशी पर्यटक मोठय़ा संख्येने उत्सवाच्या कालावधीत पुण्यात येतात. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बहुतांश मंडळांनी घेतला आहे. उत्सवाच्या कालावधीत यंदा आकर्षक देखावे साकारण्यात आले नाहीत, तसेच रोषणाईवर होणारा खर्च मंडळांनी टाळून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. यंदा अतिशय साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला.

विसर्जनाच्या दिवशी उत्सवाच्या कालावधीत मंडळांकडून स्थापित करण्यात आलेली ‘श्रीं’ची मूर्ती मंडपातच विसर्जित करण्यात येणार आहे.

घरीच ‘श्रीं’चे विसर्जन करा

करोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये. यंदाच्या वर्षी घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांनी ‘श्रीं’चे विसर्जन नदीपात्रात करू नये, घरीच विसर्जन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले आहे. अनेक जण दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात. त्यांनी मंगळवारी (१ सप्टेंबर) घरीच विसर्जन  करावे. नदीपात्रात विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यंदा अडथळे नाहीत

दरवर्षी विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी रात्री मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता येथील गल्ली-बोळात बांबूचे तात्पुरते अडथळे टाकण्यात येतात. यंदाच्या वर्षी मिरवणूक नसल्याने अडथळे टाकण्यात येणार नाहीत. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मध्यभागातील दुकाने तसेच व्यापारी पेठ बंद असते.  विसर्जन सोहळ्यानंतर तिसऱ्या दिवशी व्यवहार पूर्ववत होतात.

विसर्जनाच्या पूर्वसंध्येला दर्शनासाठी गर्दी उसळली

करोनाच्या संसर्गात गर्दी; पोलिसांकडून रस्ते बंद

पुणे : विसर्जनाच्या पूर्वसंध्येला मध्य भागात गर्दी उसळली. शहर व जिल्ह्य़ातून आलेल्या भाविकांची सोमवार मध्यरात्रीपर्यंत गर्दी होती. मध्य भागातील रस्ते बंद होते.

शहरात करोनाबधितांची संख्या वाढत असताना नागरिकांची मध्य भागात मानाच्या मंडळांच्या ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत आहे. करोनाच्या संसर्गात दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करणे पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरले आहे. दरवर्षी उत्सवाच्या कालावधीत सायंकाळनंतर मध्य भागातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवून पोलिसांकडून एकेरी पादचारी मार्ग योजना राबविण्यात येते. यंदाच्या वर्षी उत्सवातील पहिले सहा दिवस गर्दी कमी होत होती. त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी खुले ठेवण्यात आले होते.  रविवारी सायंकाळी  गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी मध्य भागातील रस्ते बंद केले.

जल्लोषी वातावरण यंदा नाही

पुणे : विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशीची लगबग यंदा पाहायला मिळाली नाही.  मिरवणुकीच्या आदल्या दिवशी सायंकाळनंतर मंडळांचे कार्यकर्ते ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन मिरवणूक मार्गावर यायचे. त्यानंतर रांगा लावणारे कार्यकर्ते आणि पोलीस मिरवणूक मार्गावर असायचे. यंदा हे दृश्य पाहायला मिळणार नसल्याने कार्यकर्त्यांना चुकचुकल्यासारखे वाटत आहे.

विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांची तयारी आदल्या दिवशी सुरू व्हायची. विसर्जन मिरवणुकीतील आकर्षक रथ तसेच सजावट डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरते. विसर्जन मार्गावर आदल्या दिवशी ट्रॅक्टर-ट्रॉली आणून रात्रभर त्यावर सजावटीचे काम करायचे. रात्रभर जागरण करून पुन्हा कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी व्हायचे. विसर्जन मिरवणुकीत साकारण्यात येणारे आक र्षक रथाचे काम यंदा पाहायला मिळत नाही. मिरवणूक मार्गावर साकारण्यात येणारे देखावे पाहण्यासाठी आदल्या दिवशीच गर्दी व्हायची. मिरवणुकीत कोणता देखावा साकारला जाणार आहे, याची उत्सुकता कार्यकर्त्यांबरोबरच सामान्यांना असते. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने मिरवणुकीच्या आदल्या दिवशीची लगबग तसेच जल्लोषी वातावरण पाहायला मिळणार नाही. विसर्जनाच्या आदल्या दिवशी दरवर्षी मंडळांकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. यंदा पूजेचे आयोजन केले असले तरी मांडवातील वातावरण काहीसे वेगळेच आहे.

पानसुपारीची परंपरा खंडित

अनेक मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी पानसुपारीचा कार्यक्रम मांडवात आयोजित केला जातो. त्यानिमित्ताने मंडळांचे हितचिंतक, मित्रमंडळी एक त्र यायचे. करोनाच्या संसर्गामुळे अनेक मंडळांनी यंदा पानसुपारीचा कार्यक्रम किंवा परंपरा खंडित केली आहे.

विसर्जन मिरवणूक नसल्याने लक्ष्मी रस्त्यावरील दुकाने आज सुरू

पुणे : वैभवशाली गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणुकीने सांगता होण्याची प्रथा यंदा खंडित झाल्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील दुकाने मंगळवारी (१ सप्टेंबर) सुरू राहणार आहेत. विसर्जन मिरवणुकीमुळे दरवर्षी दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा प्रघात असताना यंदा अनंत चतुर्दशीला पहिल्यांदाच लक्ष्मी रस्त्यावरील दुकाने ग्राहकांसाठी सुरू राहतील.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांनी यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. अनेक मंडळांनी मंदिरामध्येच गणरायाची प्रतिष्ठापना केली. तर, काही मंडळांनी छोटेखानी मंडप उभारला. उत्सव मंडपामध्ये किंवा मंदिरामध्येच गणरायाचे विसर्जन करण्याचे मंडळांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे दहा दिवसांच्या सेवेनंतर अनंत चतुर्दशीला ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याची प्रथा पहिल्यांदाच खंडित झाली आहे. मिरवणूक लांबत असल्याने लक्ष्मी रस्त्यावरील दुकाने अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमेला बंद ठेवावी लागत असत. यंदा मिरवणूक नसल्याने लक्ष्मी रस्त्यावरील दुकाने प्रथमच सुरू राहतील. गणेशोत्सवाचे मंडप, ध्वनिवर्धक यामुळे दरवर्षीचा उत्साह यंदा करोना संकटामुळे नाही. विसर्जन मिरवणूक काढली जाणार नाही. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील दुकाने मंगळवारी खुली ठेवण्यात येणार आहेत. सोन्या मारुती चौक येथील सराफ बाजारातील दुकानेही उघडी राहणार आहेत, असे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आणि पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले.