पुणे शहरातील करोना विषाणू बाबतच्या नियमावलीची मुदत आज ३१ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता, पुढील आदेश येईपर्यंत हेच नियम कायम राहतील, असा आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत. यामुळे शहरातील व्यापारी वर्गाला दिलासा नाहीच. हे आजच्या आदेशातून स्पष्ट होत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात करोना आढावा बैठक झाली. तेव्हा सोमवार पर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यातील नियम शिथिलते बाबत निर्णय मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करून घेतला जाईल, असे त्यांनी जाहीर केले होते. पण राज्यात आलेल्या महापुराच्या पाहणी दौर्‍यामुळे हा निर्णय लांबणीवर पडला. त्यानंतर काल होणार्‍या बैठकीत तरी नियम शिथिल होतील वाटले होते. पण त्या बैठकीत देखील नियम जैसे थे, येत्या दोन दिवसात निर्णय होईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. यानंतर आज तरी निर्णय घेतला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पूर्वीसारखेच करोनाबाबत पुढील आदेश येईपर्यंत नियमांचे पालन करावे लागणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. या आदेशानुसार व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला नसून आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.