गुंतवणुकीच्या आमिषाने सर्वसामान्यांना गंडविण्याच्या घटनांमध्ये शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. मात्र कोटय़वधी रुपयांची फसवणूक होऊनही अशा प्रकारांमध्ये वैयक्तिकरीत्या तक्रारदार पुढेच येत नसल्यामुळे नवीच समस्या निर्माण झाली आहे. एकीकडे पुणे शहरात ठकसेनांचा सुळसुळाट झाला असताना तक्रारदारांची मात्र वानवा असल्याचा अनुभव पोलीस घेत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आता पुढाकार घेतला असून पोलिसांनीच आता गुंतवणूकदार जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
गेल्या वर्षभरात पुणे शहरात आर्थिक फसवणुकीचे फक्त १८ गुन्हे दाखल झाले. त्यातील बहुतांश गुन्हे गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे आहेत. सेबीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी समृद्ध जीवन या चिटफंड कंपनीचा सर्वेसर्वा महेश मोतेवार आणि कंपनीच्या अन्य संचालकांविरुद्ध पुण्यातील चतु:शृंगी आणि डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. समृद्ध जीवन प्रकरणातील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे.
पुण्यात आर्थिक फसवणुकीचे तसेच गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून आणि इतरही अनेक मार्गानी आर्थिक फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत असूनही तक्रारदार मात्र पोलिसांकडे येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तक्रारी दाखल होत नसल्यामुळे पोलिसांकडेही अशा फसवणुकीबाबतची माहिती गोळा होत नाही. यावर उपाय म्हणून पोलिसांनीच पुढाकार घेतला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांच्या संकल्पनेतून गुंतवणूकदार जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. फसवणुकीच्या घटना रोखणे आणि गुंतवणूकदारांना तक्रार देण्यास उद्युक्त करणे असे या मोहिमेचे दोन हेतू आहेत. या मोहिमेअंतर्गत बुधवारी (१७ फेब्रुवारी) गुंतवणूकदारांसाठी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. लष्कर पोलीस ठाण्यामागे असलेल्या संवाद हॉल येथे सायंकाळी पाच वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी दिली.
पुण्यात आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ होत आहे. त्या तुलनेत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण नगण्य आहे. बऱ्याचदा वैयक्तिक तक्रारी घेऊन तक्रारदार येत नाहीत. तक्रार दिल्यास कंपनीविरुद्ध पोलीस कारवाई करतील आणि गुंतवलेले सगळेच पैसे बुडतील, अशी भीती तक्रारदारांना वाटते. त्यामुळे फसवणुकीचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे, असे निरीक्षण राजेश पुराणिक यांनी नोंदविले. गुंतवणूकदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेचा फायदा पोलिसांना देखील होणार आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे शक्य होईल. गुंतवणूकदारांनी त्यांच्या तक्रारी या मेळाव्यात मांडाव्यात. तसेच तक्रार अर्ज पोलिसांकडे पाठवावेत किंवा आर्थिक गुन्हे शाखा (दूरध्वनी- ०२०- २५५४००७७) येथे तक्रारी नोंदवाव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मोहिमेसाठी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा पुढाकार
मेळाव्यात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
गुंतवणुकीबाबत फसवणूक झाली असल्यास तक्रार देता येणार
मेळावा, बुधवारी सायंकाळी पाच वाजता
संवाद हॉल, लष्कर पोलीस ठाण्यामागे