पुणे शहरामध्ये गॅसची कोणत्याही प्रकारची टंचाई नाही. शहरात बुकिंग केलेले गॅस सििलडर परत येण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे टंचाईसारख्या काही समस्या निर्माण होता. त्यामुळे गरज नसताना सिलिंडरचे बुकिंग करणे टाळावे, असे आवाहन भारत पेट्रोलियमचे क्षेत्रिय अधिकारी महेश जंगम यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने ग्राहक दिनाच्या औचित्याने ‘गॅस जनवाणी’ चे आयोजन करण्यात आले होते. त्यात गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ग्राहकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. अन्नधान्य पुरवठा अधिकारी ज्ञानेश्व जवंजाळ, ऑल इंडिया गॅस डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनच्या उषा पुनावाला, भारत पेट्रोलियमचे मौलिक कापडिया आदींनी त्यात सहभाग घेतला. पंचायतीचे भीमसेन खेडकर, विलास लेले आदी त्या वेळी उपस्थित होते. केवायसी, स्मार्ट कार्ड, अनुदानित गॅस सिलिंडर, आधार कार्ड आदींबाबतच्या ग्राहकांच्या प्रश्नांना उपस्थितांनी उत्तरे दिली.
जंगम म्हणाले, गॅस सिलिंडरची सध्या कोणतीही समस्या नाही. उलट बुकिंग केलेला सिलिंडर परत येण्याचे प्रमाण शहरात २० ते २५ टक्के आहे. त्यामुळेच समस्या निर्माण होत आहेत. एकाच पत्त्यावर दोन गॅस जोड असणाऱ्यांचे जोड सध्या बंद करण्यात आले आहेत. अशा प्रकारे जोड बंद करण्यात आलेल्या ग्राहकांनीच  केवायसी अर्ज भरून द्यायचे आहेत. सर्वाना हे अर्ज भरून देणे सक्तीचे नाही. गॅसवरील अनुदानाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याची योजना अद्याप सुरू झालेली नाही. त्याबाबत शासनाकडून अद्याप कोणत्याही नव्या सूचना पेट्रोलियम कंपन्यांना आल्या नाहीत.
पुनावाला म्हणाल्या, केवायसी भरून देताना ग्राहकांनी संपूर्ण पत्ता देणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्जामुळे अनेक अर्ज रद्द झाले. आधार कार्ड नसेल, तर गॅस नाही, असा कोणताही निर्णय झालेला नाही.
जवंजाळ म्हणाले, गॅसबाबत अनेक तक्रारी होत्या. गॅस न मिळणे, जादा पैसे आकारणे, गॅस जोडबरोबर इतर वस्तू घेण्याची सक्ती असणे, अशा स्वरूपाच्या तक्रारी न येण्याबाबत वितरक व कंपन्यांनी लक्ष घातले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांना गॅस सिलिंडर वाहून न्यावा लागणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.