भाजीपाल्याची नियमित आवक सुरू; मार्केटयार्डात ४३० गाडय़ा आवक

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात भाजीपाल्याची नियमित आवक सुरू झाली असून घाऊक बाजारात मंगळवारी ४३० गाडय़ांमधून भाजीपाल्याची आवक झाली. मांजरी, मोशी तसेच खडकीतील उपबाजारातही मोठी आवक झाली. दरम्यान, शहरात भाजीपाला, फळे तसेच भुसारमालाचा अजिबात तुटवडा नाही. नागरिकांनी भीतीपोटी साठवणूक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

बाजार समितीकडून मार्केट यार्डात विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी दिवसाआड भाजीपाला आणि कांदा-बटाटा  तसेच फळ विभागाचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी बाजारात फळे आणि कांदा बटाटय़ाच्या गाडय़ांची आवक सुरू झाली. त्यात १२२ गाडय़ा कांदा-बटाटय़ाच्या होत्या. मंगळवारी पहाटे बाजाराचे कामकाज सुरू झाल्यानंतर बाजारात टप्याटप्याने आडते, मुख्य खरेदीदारांना प्रवेश देण्यात आला. मंगळवारी मार्केटयार्डातील बाजारात भाजीपाल्याच्या ४३० गाडय़ा दाखल झाल्या.

बाजार समितीचे ४०० कर्मचारी कामकाजाची पाहणी करत होते. दुपारी बारा वाजेपर्यंत बाजारातील सर्व व्यवहार पार पडले. खडकी, मोशी येथील बाजारातही मंगळवारी आवक झाली, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.

बाजारात टप्प्याटप्प्याने खरेदीदार, आडत्यांना प्रवेश देण्यात येत आहे. बाजारात पट्टे आखून देण्यात आले आहेत. मास्क घालून सर्व व्यवहार तसेच पुरेशी सुरक्षा बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आडते, खरेदीदार, टेम्पोचालक यांना ओळखपत्र देण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.

आडते संघटनेकडून कामकाज सुरू

करोनामुळे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते संघटनेकडून व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बुधवारपासून (१ एप्रिल) पुन्हा व्यवहार सुरळीत करण्यात येणार आहे. मंगळवारी भाजीपाला विभागातील कामकाज सुरू होते. बुधवारी फळे आणि कांदा-बटाटा विभागाचे कामकाज सुरू राहणार असून पहाटे ४ ते सकाळी १० यावेळेत कामकाज सुरू राहणार आहे. मार्केटयार्डातील फळे, भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभागाचे काम नियोजनानुसार टप्याटप्याने सुरू राहणार आहे. याबाबतची माहिती आडत्यांनी शेतक ऱ्यांना देऊन किमान महिनाभर मर्यादित शेतीमाल मागवावा. आडते, दिवाणजी, हमाल, कामगारांना ओळखपत्र देण्यात आले आहे. बाजारआवारातील सर्व घटकांनी गाळ्यावर काम करताना किमान तीन फुट अंतर ठेवावे, असे आवाहन आडते संघटनेकडून करण्यात आले आहे.

६९२ गाडय़ांमधून १९ हजार ९०० क्विंटल भाजीपाला

मोशी येथील उपबाजारात ११० गाडय़ांमधून भाजीपाल्याची आवक झाली. मांजरी येथील उपबाजारात १३२ गाडय़ा तसेच खडकी येथील उपबाजारात २० गाडय़ांमधून भाजीपाल्याची आवक झाली. मार्केटयार्ड, मांजरी, मोशी, खडकी येथील बाजारात एकूण मिळून ६९२ गाडया भाजीपाला विक्रीसाठी पाठविण्यात आला. मुख्य तसेच उपबाजारात एकूण मिळून १९ हजार ९९० क्िंवटल भाजीपाल्याची आवक झाली, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.