खासगी वाहतुकीशी स्पर्धा, डिझेलच्या दरामध्ये वारंवार होणारी वाढ यामुळे डबघाईला आलेली एसटी सेवा भविष्यामध्ये टोलमुक्त होणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,‘‘विद्यार्थी, अंध-अपंग, ज्येष्ठ नागरिक अशा विविध २४ प्रवर्गाना सवलत दिली जाते. ही सवलत काढून घेणे शक्य होणार नाही. प्रवासी करातील ५१ टक्के रक्कम राज्य मार्ग परिवहन महामंडळाला दिली जाते. पण, डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने खर्च भागविताना अडचणी येत आहेत. खासगी वाहतुकीशी स्पर्धादेखील करावी लागत असल्याने प्रवाशांच्या संख्येवर परिणाम होत आहे. त्यामुळे एसटी बसला टोलपासून मुक्त करा, असे पत्र टोल घेणाऱ्या एका संस्थेला दिले होते. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भविष्यात, टेंडर काढताना एसटी बसकडून टोल घेतला जाऊ नये, अशी अट घालण्यात येणार आहे.
पुणे शहरातील जैवविविधता नियोजनासंदर्भातील नियम निर्गमित केले आहेत. यासंदर्भात काही घटकांचा बांधकामाला विरोध आहे, तर काही लोकांना डोंगरावर बांधकामास परवानगी हवी आहे. त्यामुळे यामध्ये मध्यममार्ग काढला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील सर्व महापालिकांमधील शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. शिक्षण मंडळामध्ये भ्रष्टाचाराच्या वाढत्या प्रकरणांसंदर्भात तक्रारी येत आहेत. अनेक जणांनी मला निवेदने दिली आहेत. मात्र, याविषयी मंत्रिमंडळामध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

पाण्याची अडचण येणार नाही
पुणे विभागामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असली तरी पाण्याची अडचण येईल असे वाटत नाही. नियोजन चांगले केले असल्यामुळे काळजी करण्यासारखी स्थिती नाही. मात्र, सर्वानी पाणी जपून वापरले पाहिजे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. दुष्काळी जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांची त्यांनी आढावा बैठक घेतली. ते म्हणाले, ‘‘जुन्या तलावातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. तर, मुख्यमंत्री दुष्काळ निधी हा कायमस्वरूपी पाणी योजनांसाठी वापरण्यात येणार आहे. ‘नरेगा’च्या कामांवर असलेल्या मजुरांसाठी पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा असलीच पाहिजे असा सरकारचा कायदा आहे. भविष्यात ही मर्यादा तीन हजार लोकसंख्येपर्यंत खाली आणण्यात येणार आहे.’’