राजमाची किल्ल्याकडे जाण्यासाठी जंगलातून रात्री ट्रेकिंग करण्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदी घालण्याचा पुणे ग्रामीण पोलीस विचार करीत आहेत. सध्या सुरक्षिततेच्या  दृष्टीने या भागात रात्री पोलीस, वनविभागाचे सुरक्षारक्षक आणि पुरातत्त्व विभाग यांनी संयुक्त गस्त सुरू केली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी सांगितले.
याबाबत लोहिया यांनी सांगितले की, राजमाची किल्ल्याकडे जाण्यासाठी अनेक तरूण-तरुणी रात्रीच्या वेळी ट्रेकिंग करीत किल्ल्याकडे जातात. रस्त्यात जंगल असल्यामुळे हिंस्र प्राणी किंवा इतर गोष्टींचा धोका आहे. त्याच बरोबर अंधारात रस्ता चुकण्याचा धोकादेखील असतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्री बारा ते पहाटे चारदरम्यान होणाऱ्या ट्रेकिंगवर बंदी घालण्याचा विचार आहे. पर्यटनाला आमचा विरोध नाही. मात्र, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा विचार केला जात आहे. सध्या या भागात पोलीस, वनविभाग आणि पुरातत्त्व विभाग यांची रात्री संयुक्त गस्त सुरू आहे. शनिवार आणि रविवारी रात्री ट्रेकिंग जास्त होत असल्यामुळे या दोन दिवस अधिक वेळ गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.
द्रुतगतीवरील हल्लाप्रकरणी अद्याप अटक नाही
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेतजवळ पाणी घेण्यासाठी थांबल्यानंतर एका महिलेवर हल्ला केल्याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. या ठिकाणी पूर्वी अनेक जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये पूर्वी अटक केलेल्या आरोपींची माहिती काढून त्याबाबत तपास सुरू आहे. या हल्ल्यामागे पूर्वी या ठिकाणी जबरी चोरी करणारेच आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिसांची पथके तपास करीत आहेत, अशी माहिती मनोज लोहिया यांनी दिली.