पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाणी येत नसल्याने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर महिलांनी हंडा मोर्चा काढला. यावेळी महिलांनी बापट यांना घेराव घालून त्यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. त्यांनी बापट यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. पाणीपुरवठा सुरळित होईल असे आश्वासन देऊन बापट तेथून गेले. त्यानंतरही पाणीपुरवठा सुरु न झाल्याने संतप्त महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी महिलांनी लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी व्यक्त केली.

पुणे शहरातील विविध भागात गेल्या आठवड्याभरापासून पाणीपुरवठा विस्कळीत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामध्ये शिवाजीनगर येथील मॉर्डन महाविद्यालयाच्या बाजूला असणाऱ्या पोलीस वसाहतीमध्ये देखील मागील चार दिवसांपासून पाणी येत नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी, रविवार सकाळच्या सुमारास पोलीस वसाहती समोरील रस्त्यावर महिलांनी रास्ता रोको केला. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर महिलांनी हंडा मोर्चा काढता पाणीपुरवठा सुरळीत करा, या मागणीसाठी आंदोलन केले. यावेळी पालकमंत्र्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांचा रोष पाहता बापट यांनी महिलांची भेट घेऊन त्याची समस्या जाणून घेतली.

यावेळी पोलीस वसाहतीमधील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन बापट यांनी महिलांना दिले.