|| भक्ती बिसुरे

महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या पातळीत प्रचंड वाढ

शहरातील वाढती रहदारी, त्यातून उद्भवणारी वाहतूक कोंडी आणि त्यावर मोठमोठय़ाने हॉर्न वाजवण्याची शहरातील नागरिकांची सवय हे शहरातील नित्याचे चित्र झाले आहे. मात्र याची गंभीर बाजू अशी की सर्वसामान्य निरोगी व्यक्तीच्या कानावर रोज अध्र्या तासापेक्षा जास्त वेळ ८० डेसिबलपेक्षा अधिक आवाज आदळत असेल तर त्यांना बहिरेपणाचा धोका असतो. त्यामुळे दिवसा आणि रात्री बहुतांश वेळ ८० डेसिबलपेक्षा अधिक आवाज कानावर पडणाऱ्या पुणेकरांवर बहिरेपणाचे संकट असल्याचे स्पष्ट होत आहे.

२०१६-१७ वर्षांसाठी पुणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालावरून शहरातील ध्वनिप्रदूषणाची पातळी प्रचंड वाढली असल्याचे निष्पन्न झाले होते. ‘नॅशनल एन्व्हायर्नमेंट इंजिनिअरिंग रीसर्च इन्स्टिटय़ूट’ (निरी) या संस्थेने केलेल्या अभ्यासानेही या माहितीला दुजोरा दिला आहे.

महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार शहरातील औद्योगिक क्षेत्रातदेखील दिवसा ७५ डेसिबल तर रात्री ७० डेसिबल मर्यादेच्या वरील आवाजाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नाही. शहरात मात्र सातत्याने विविध प्रकारच्या आवाजांचा मारा नागरिकांच्या कानांवर होत असून हा आवाज दिवसा ८७ डेसिबल तर रात्री ८३ डेसिबल असल्याचे ‘निरी’चे शास्त्रज्ञ रितेश विजय यांनी सांगितले.

कान, नाक आणि घशाच्या आजाराचे तज्ज्ञ डॉ. राजीव यंदे म्हणाले, एकाच तीव्रतेचा आवाज अध्र्या तासापेक्षा जास्त वेळ कानावर पडत राहिल्यास कानांच्या क्षमतेवर त्याचा विपरित परिणाम होतो. शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीचे प्रचंड तीव्रतेचे आवाज, मोठमोठय़ाने हॉर्न वाजवल्याने निर्माण होणारा गोंगाट यांचा विपरित परिणाम केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच नव्हे तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर देखील होतात. अवजड यंत्रांच्या सान्निध्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित असलेला बहिरेपणाचा धोका आता सामान्य नागरिकांमध्येही दिसत असून त्याचे रुग्ण वाढत आहेत.

काय काळजी घ्याल?

  • अवजड यंत्रांच्या ठिकाणी काम करत असल्यास उत्तम दर्जाच्या आवाज रोधक उपकरणांचा वापर करा.
  • रहदारीच्या रस्त्यावर वाहन चालवताना अनावश्यक हॉर्न वाजवू नका.
  • प्रचंड तीव्रतेचे आवाज अध्र्या तासाहून जास्त काळ कानावर पडू देऊ नका.
  • मोबाइल फोनवरील संगीत ऐकताना हेडफोनऐवजी स्पिकरचा वापर करा.

‘निरी’चे निरीक्षण

  • शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसा ८७.६ तर रात्री ८३.५ डेसिबल आवाज.
  • इतर रस्त्यांवरच्या आवाजाची पातळी ही दिवसा ८४.५ आणि रात्री ७८.५ च्या घरात.
  • शांतता क्षेत्रात दिवसा आवाजाची तीव्रता दिवसा ७७.६ तर रात्री ६७.५ एवढी.

अनेक तरुण जोरात आवाज ठेवून हेडफोनद्वारे संगीत ऐकतात. रोज अध्र्या तासापेक्षा जास्त वेळ असा आवाज कानावर आदळल्याने त्याचे परिणाम भयंकर होतात. कानाचे दुखणे घेऊन तपासणीसाठी येणाऱ्यांच्या संख्येत त्यामुळे वाढ झाली आहे.    -डॉ. राजीव यंदे, वैद्यकीय तज्ज्ञ