सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचा निकष कागदावरच; नव्या- जुन्यांचा वाद पुन्हा ऐरणीवर

पिंपरी पालिकेतील आठ क्षेत्रीय (प्रभाग) कार्यालयांच्या प्रत्येकी तीन याप्रमाणे २४ स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया गुरूवारी पार पडली. निर्विवाद बहुमत असल्याने सर्वच ठिकाणी भाजप उमेदवारांची वर्णी लागली. लोकसभा-विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांची नावे निवडली असली तरी, यानिमित्ताने भाजपमधील अंतर्गत राजकारण ढवळून निघाले असून नव्या-जुन्यांचा वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालिका निवडणुकीत ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली, त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. बहुतांश सर्वच सदस्य राजकीय क्षेत्राशी संबंधित असल्याने सामाजिक अथवा विविध क्षेत्रात कार्य करण्याचा निकष कागदोपत्रीच राहिला आहे.

वर्षभर रखडलेली प्रभाग स्वीकृत सदस्यांची निवड अखेर गुरूवारी पार पडली. या विषयावरून गेले काही दिवस भाजपमध्ये प्रचंड धुसफूस सुरू होती. २४ जागांसाठी १२१ इच्छुक उमेदवारांचे अर्ज होते. एकेक नाव निवडताना भाजप नेत्यांना प्रचंड कसरत करावी लागली. निवड प्रक्रियेत शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांचा प्रभाव दिसून येतो. आपल्या समर्थकांचा समावेश न झाल्याने पक्षातील इतर नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काही कार्यकर्त्यांनी आंदोलन करत निषेधही व्यक्त केला. निवड झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक घराण्यांमधील नावे प्राधान्याने दिसून येतात. पालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आलेल्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. माजी उपमहापौर अमर मूलचंदाणी यांचे समर्थक राजेश सावंत यांची वर्णी लागली आहे. भाजपचे दिवंगत नेते अंकुश लांडगे यांचे निकटवर्तीय असलेल्या गोपी धावडे यांना संधी देण्यात आली. कुणाल लांडगे यांना संततुकारामनगर-कासारवाडी प्रभागातून भाजपने उमेदवारी दिली होती. तथापि, ते पराभूत झाले होते. ‘स्वीकृत’ करून लांडगे यांचे पुनर्वसन करण्यात आले. राजेंद्र काटे यांना भाजपने दापोडीतून उमेदवारी दिली होती, ते पराभूत झाले होते. मात्र, काटे यांच्या मुलाला स्वीकृत करून घेण्यात आले. काटे यांचेच समर्थक असलेल्या संजय कणसे यांची वर्णी लागली आहे. रिपाइंकडून राजेंद्र कांबळे यांना संधी देण्यात आल्याचे भाजपने म्हटले आहे.

  • ‘अ’ प्रभाग : राजेश सावंत, सुनील कदम, राजेंद्र कांबळे
  • ‘ब’ प्रभाग : बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर, देविदास पाटील
  • ‘क’ प्रभाग : वैशाली खाडे, गोपी धावडे, सागर िहगणे
  • ड’ प्रभाग : चंद्रकांत भूमकर, संदीप नखाते, महेश जगताप
  • ‘ई’ प्रभाग : अजित बुर्डे, साधना सचिन तापकीर, विजय नामदेव लांडे
  • ‘फ’ प्रभाग : दिनेश यादव, संतोष मोरे, पांडुरंग भालेकर
  • ‘ग’ प्रभाग : संदीप गाडे, गोपाळ माळेकर, विनोद तापकीर
  • ह’ प्रभाग : संजय कणसे, कुणाल लांडगे, अनिकेत राजेंद्र काटे

दोन वर्षांसाठीच निवड

स्वीकृत सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो. मुळातच एक वर्षांने उशिरा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे सदस्यांना चार वर्षांचा कालावधी मिळणार होता. मात्र, ही निवड दोनच वर्षांची राहणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे. यंदा इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना संधी देता आली नाही, असा मुद्दा पुढे करून दोन वर्षांनंतर पुन्हा २४ सदस्यांना नव्याने संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.