राज्यातील विविध विलगीकरण कक्षांमध्ये दाखल असलेल्या करोना संशयितांना करोनाचा संसर्ग नसल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे ही माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आली आहे.

शुक्रवापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४४ हजार ५१७ प्रवासी तपासण्यात आले. चीन आणि करोना बाधित इतर देशांतून राज्यात २७९ प्रवासी आले आहेत. ताप, सर्दी, खोकला यांसारखी विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्याने त्यांपैकी ७७ रुग्णांना राज्यातील विविध रुग्णालयांच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तसेच त्यांचे वैद्यकीय नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञन संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. करोनाचा संसर्ग न आढळल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले असून मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यातील नायडू रुग्णालयातील चार रुग्ण अद्याप विलगीकरण कक्षात आहेत.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वुहान येथून परतलेल्या सर्व प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे धोरण राबवण्यात आले. हे सर्व नागरिक निरोगी असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र, बाधित प्रदेशांत प्रवास करून आलेल्या रुग्णांचा नियमित पाठपुरावा करण्यात येत असून, देशात करोना संसर्गाचा धोका नसला, तरी संपूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.