थंडी संपून उन्हाच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली असतानाच, अनाहूत बनून आलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी पुणेकरांना अचानक धक्का दिला. शहराच्या बहुतेक सर्व भागांत शुक्रवारी सकाळी सुमारे पंधऱा मिनिटे पावसाच्या सरी बरसत होत्या.
कोणतीच चाहूल लागू न देता अचानक आलेल्या पावसामुळे सकाळी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली. त्यातच पावसाच्या सरींमुळे रस्त्यावर घसरडे झाल्याने अनेक दुचाक्या घसरू लागल्या. जंगली महाराज रस्त्यावर एका मागून एक दुचाकी चालक घसरू लागल्यामुळे वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर मधोमध उभे राहून वाहनचालकांना वाहन सावकाश चालवण्याच्या सूचना केल्या. पंधरा मिनिटे मनसोक्तपणे बरसल्यानंतर लगेचच आकाश पुन्हा निरभ्र झाले आणि सूर्याची किरणे नागरिकांची सोबत करण्यास पुन्हा सज्ज झाली.