उत्तर कोरिया या देशाने रविवारी (३ सप्टेंबर) भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजता हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. जमिनीवर किंवा जमिनीखाली स्फोट केल्यास तेव्हा परिस्थिती भूकंपासारखीच असते, अशी माहिती  भूगर्भ अभ्यासक अरुण बापट यांनी दिली.

अशा प्रकारे झालेल्या भूकंपाची नोंद जगातील सर्व भूकंपमापक केंद्रात होत असते. पृथ्वीवर कोठेही भूकंप किंवा स्फोट झाला तर, त्याची भूकंपमापक यंत्रावर आणि उपग्रहाद्वारे ज्याठिकाणी स्फोट होतो तेथील रेडिओअ‍ॅक्टिव्हिटी वाढलेली आळढून येते, अशा विविधप्रकारे ही नोंद होऊ शकते. तसेच अणुस्फोट किंवा त्यासारख्याच स्फोटाची नोंद करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची यंत्रणा कार्यान्वित केलेली असते. भारतात अशा प्रकारची यंत्रणा बंगळुरुनजीक गौरीबिदनूर येथे आहे. या यंत्रात एकूण एकवीस भूकंपमापक लावलेले आहेत. त्याची रचना इंग्रजी वर्णाक्षर ‘टी’ सारखी आहे. सुरुवातीच्या काळात ही यंत्रणा गुप्त स्वरुपात चालविली जात असे. परंतु, आता त्यावरील र्निबध उठवण्यात आले आहेत, असेही बापट यांनी सांगितले.

सन १९८७ – ८८ च्या सुमारास अणुस्फोट विरोधी करार जिनेव्हा येथे झाला होता. तत्कालीन सोव्हिएत युनिअनने केलेल्या अणुस्फोटानंतर कझाकस्तान येथे ५.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर लगेच वीस मिनिटांमध्ये दुसरा भूकंप झाल्याची नोंद झाली. साऱ्या जगाला हा भूकंपानंतर झालेला धक्का आहे असे वाटले. मात्र, मार्कुस बाथ या स्वीडिश भूकंपतज्ज्ञाने हा अणुस्फोट आहे, हे सिद्ध करुन दाखविले. भूकंपमापक यंत्रावर येणाऱ्या इंग्रजी ‘एस’ आणि ‘पी’ तरंगांचा योग्य उपयोग करुन बाथ यांनी हे सिद्ध करुन दाखवले, अशीही माहिती अरुण बापट यांनी दिली.