12 August 2020

News Flash

खासगी कंपन्यांचा शिक्षणात शिरकाव रोखणार!

शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांची स्पष्ट भूमिका

संग्रहित छायाचित्र

करोना विषाणू संसर्गामुळे सुरू झालेल्या ऑनलाइन शिक्षणातील संधी पाहून खासगी कंपन्यांनी उपयोजने (अ‍ॅप्लिके शन्स), ई -साहित्याचा पुरवठा सुरू केला आहे. मात्र, खासगी कंपन्यांचा शिक्षणात शिरकाव होऊ देणार नसल्याची भूमिका शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी सोमवारी मांडली. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक साहित्य, आशय तपासणी करूनच वापरला जात असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग चर्चा’ या उपक्रमात झालेल्या ऑनलाइन चर्चेत शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, अक्षरनंदन शाळेच्या शैक्षणिक संयोजक लारा पटवर्धन, शैक्षणिक अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांनी सहभाग घेतला. त्यांच्याशी रसिका मुळ्ये यांनी संवाद साधला. ‘लोकसत्ता’च्या फिचर एडिटर (चतुरंग) आरती कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक के ले. करोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शिक्षणाची संकल्पनाच बदलली आहे. त्यामुळे केवळ पाठय़पुस्तकांवर आधारित शिक्षणापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना जीवनकौशल्ये शिकवणे, त्यांची कौशल्यवृद्धी करणेही महत्त्वाचे आहे. तसेच शिक्षण आनंददायी होण्यासाठी पालकांचा सक्रिय सहभागही महत्त्वाचा आहे, असा सूर या चर्चेत व्यक्त झाला.

गायकवाड म्हणाल्या की, शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्र प्रमुख, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ यांच्यापासून प्रत्येक घटकाशी चर्चा करण्यात आली. मात्र, प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. अनेक शाळा विलगीकरणासाठी वापरल्या जात आहेत. शिक्षकही करोनाच्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत शाळा सुरू करणे अवघड आहे. आतापर्यंत पाठय़पुस्तकांचे वितरण ९५ टक्के  झाले आहे, तर बालभारतीच्या संके तस्थळावरून आतापर्यंत १ कोटी ५१ लाख डाउनलोड्स झाले आहेत. सर्वच विद्यार्थी, पालकांकडे संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन नसल्याने दूरदर्शन, रेडिओ, व्हॉट्स अ‍ॅप या माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्य़ाद्री वाहिनीवर वेळ मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. केंद्राने स्वयंप्रभा वाहिनी उपलब्ध करून दिली आहे. जिओ टीव्हीवर ज्ञानगंगा या तीन वाहिन्या सुरू केल्या आहेत. आणखी सहा वाहिन्या सुरू केल्या जाणार आहेत. तसेच गुगल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इंटरअ‍ॅक्टिव्ह शिक्षण दिले जाईल. शासनाने तीन महिन्यांचे शैक्षणिक वेळापत्रक तयार केले आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर आहे.

पालकांनीही शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे. विद्यार्थी शिक्षणापासून दूर गेल्यास बालमजुरी, बालविवाह असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. स्थलांतरित विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश, पाठय़पुस्तके, पोषण आहार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी  दूरध्वनीद्वारेही संवाद साधावा. राज्यभरातील चांगल्या शैक्षणिक उपक्रमांचाही शोध शासन घेत आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

सद्य:स्थितीत ऑनलाइन शिक्षण पुरेसा पर्याय नाही. केवळ आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून शिक्षण होत नाही, तर प्रत्यक्ष अनुभव, कृती यातून विद्यार्थी शिकतात. ऑनलाइन शिक्षणात संवाद होत नसल्याने ते नीरस होते. पाठय़पुस्तकाच्या पलीकडे जाऊन बागकाम, घरकामांतूनही विद्यार्थी शिकतात. शाळा आणि पालकांनी आजच्या परिस्थितीकडे संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे. ऑनलाइन शिक्षणासाठीचा आशय-साहित्य झटपट निर्माण करणे सोपे नाही. त्यामुळे उपलब्ध साहित्याचाही वापर के ला पाहिजे. ‘घरच्या घरी’ हे संके तस्थळ, मराठी विज्ञान परिषदेचे संके तस्थळ यावरील प्रयोगातून विद्यार्थ्यांना कृतिशील शिक्षण घेता येईल. तसेच पालकही विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने शिकवू शकतात, असे पटवर्धन म्हणाल्या.

शिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थी हा सर्वात महत्त्वाचा घटक असताना शिक्षण व्यवस्था बालकेंद्रित नाही, मुलांना गृहीत धरले जात असल्याचे मत डॉ. पानसे यांनी मांडले. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले असले, तरी ते योग्य पद्धतीने होत नाही. मुलांना शिकवलेले आवडले का, समजले का हे समजून घेतले पाहिजे. मुलांच्या मानसिकतेचा विचार न करता काहीही करणे योग्य नाही. खासगी कंपन्यांचे साहित्यावर आधारित शिक्षणाकडे विद्यार्थी चालले आहेत. मात्र हे साहित्य संविधानपूरक आहे का, हे तपासले पाहिजे. ऑनलाइन शिक्षणामुळे कं पन्यांना मुलांच्या रूपाने ग्राहक मिळाले आहेत. शाळा सुरू झाल्या तरी कंपन्यांकडून येणाऱ्या साहित्याचे काय करायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या समस्या, मोबाइलचे व्यसन लागणार नाही याकडेही लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांनाही या काळात वेगळा अनुभव मिळत आहे. मेंदू कधीही थांबत नाही. त्यामुळे या काळातही विद्यार्थी शिकत राहतील, असेही पानसे यांनी नमूद केले.

‘परीक्षा घेण्याबाबत वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल’

पुढील काही महिन्यात शाळा सुरू होण्याबाबत आशावादी असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. समजा शाळा सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशा पद्धतीने करायचे याचा विचार करावा लागेल. तसेच वेगळ्या पद्धतीने परीक्षांचा विचार करावा लागेल. परीक्षांचा निर्णय परिस्थितीवर अवलंबून असेल, असेही त्या म्हणाल्या.

सविस्तर सादरीकरण १८ जुलै रोजी ‘चतुरंग’मध्ये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 12:42 am

Web Title: not allow private companies to be involved in education statement by varsha gaikwad abn 97
Next Stories
1 संशोधन संस्थांतील संशोधन प्रकल्प ठप्प
2 कोकण वगळता इतरत्र पाऊस ओसरणार
3 मावळात वर्षांविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांवर करडी नजर
Just Now!
X