महापालिकेच्या निवडणुका केव्हाही घोषित होतील अशी परिस्थिती असली तरी मतदारांना खूश करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना नोटाबंदीचा फटका बसला आहे. महापालिका निवडणुकांसाठी आपापल्या प्रभागात विविध प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजिण्याचे नियोजन इच्छुकांनी केले होते. तशा कार्यक्रमांना शहराच्या विविध भागात सुरुवातही झाली होती. मात्र नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर हातात पुरेशी रोकड नसल्यामुळे बहुतेक इच्छुकांना असे कार्यक्रम करता आलेले नाहीत. त्यामुळे इच्छुकांकडून होणाऱ्या अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांची संख्याही चांगलीच घटली आहे.

महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभागांच्या रचनेनुसार होणार आहे. त्यामुळे भौगोलिकदृष्टय़ा प्रभाग मोठे झाले आहेत. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांपुढे ते आव्हान असल्यामुळे प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोण्यासाठी आणि त्यांना खूश करण्यासाठी संगीत महोत्सव, मराठी गीतांचे कार्यक्रम, खेळ पैठणीचा अशासारखे कार्यक्रम तसेच लकी ड्रॉ आदी अनेक कार्यक्रमांचे नियोजन इच्छुकांकडून करण्यात आले होते. नोटाबंदी झाली नसती तर गेल्या महिन्यातच या कार्यक्रमांचा धडाका शहरात झाला असता. तशी तयारीही अनेक इच्छुकांनी केली होती. मात्र रोकडटंचाईमुळे अनेकांनी हे कार्यक्रम पुढे ढकलले. मात्र महापालिका निवडणुकीची आचारसंहिता चालू आठवडय़ात सुरू होण्याची शक्यता लक्षात घेता यापुढचे मोजकेच दिवस अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शिल्लक आहेत. एवढय़ा कमी कालावधीत मोठय़ा प्रमाणात कोठे कार्यक्रम आयोजित केले जातील असे सध्याचे चित्र नाही.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले, की मतदारांसाठी आयोजित करण्याच्या कार्यक्रमांचे बहुतेक खर्च रोखीत केले जातात. त्यात मुख्यत: स्थानिक प्रभागात पत्रके वाटणे, कार्यक्रमाचे फ्लेक्स लावणे, मैदानाचे भाडे, व्यासपीठ, खुच्र्याचे भाडे, पत्रिका छपाई यासह बहुतेक सर्व खर्च रोखीनेच करावे लागतात. यावर उपाय म्हणून काही इच्छुकांनी ‘लकी ड्रॉ’ आयोजित करून त्यात बक्षिसांची लयलूट केली आहे. मात्र त्यासाठी त्यांनी कोणतेही कार्यक्रम आयोजित केलेले नाहीत. संबंधित इच्छुक उमेदवाराच्या कार्यालयातून अर्ज न्यायचा आणि तो भरून आणून द्यायचा. काही काळानंतर लकी ड्रॉची सोडत काढायची अशाप्रकारे सध्या काही प्रभागांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन होत आहे.