21 February 2019

News Flash

शहरी विद्यार्थ्यांच्या दप्तरातून पाटी हरवली..

बहुतेक शाळांमध्ये पूर्वप्राथमिक वर्गापासूनच पाटी आणि पेन्सिलीची जागा वही आणि पेन्सिलीने घेतली आहे.

वही आणि पेन्सिलीने घेतली जागा; मागणीत निम्म्याने घट
शिक्षणाची सुरुवात, शाळेचा पहिला दिवस म्हणजे पाटी आणि पेन्सिलीशी जोडले जाणारे नाते.. हे समीकरण काळाच्या ओघात बदलत गेले आहे. शाळेच्या दप्तरातील अविभाज्य भाग असलेले पाटी, पेन्सिल, स्पंजची डबी हे त्रिकुट आता इतिहासजमा होत असून, या साहित्याची मागणी पन्नास ते साठ टक्क्य़ांनी घसरली असल्याचे उत्पादकांनी सांगितले. शहरांतील विद्यार्थ्यांच्या दप्तरातून तर आता पाटीच हद्दपार झाली आहे.
पाटी असे म्हटले तरी अनेक पिढय़ांच्या शाळेच्या आठवणी झटक्यात जाग्या होतात. शिक्षणाच्या प्रवासात बदलत गेलेल्या पाटय़ा, पेन्सिलीचे तुकडे साठवणे, ते चोरून खाणे अशा अनेक आठवणी डोक्यात पिंगा घालू लागतील. मात्र, आता मुलांच्या दप्तरातील पाटी हरवल्याचे दिसत आहे. पहिलीपासून विषयानुसार पुस्तके, वह्य़ा, कंपास असा विद्यार्थ्यांच्या दप्तराचा जामानिमा असतो मात्र त्यात आता पाटीला स्थान राहिलेले नाही.
बहुतेक शाळांमध्ये पूर्वप्राथमिक वर्गापासूनच पाटी आणि पेन्सिलीची जागा वही आणि पेन्सिलीने घेतली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांच्या कालावधीत पाटी आणि पेन्सिलीची मागणी ५० ते ६० टक्क्य़ांनी घटल्याचे उत्पादकांनी सांगितले. शहरी भागांतून दगडी किंवा पुठ्ठय़ाच्या पाटय़ांची आणि त्यावर लिहिण्यासाठीच्या पेन्सिलींची विक्री ही अगदी नाममात्र राहिली आहे. ग्रामीण भागांतून मात्र अजूनही पाटय़ांना मागणी असल्याचे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. शहरी भागांत नाही म्हणायला पाटीचाचा अद्ययावत अवतार असलेली ‘मॅजिक स्लेट’, ‘व्हाइट बोर्ड्स’ यांना मागणी आहे. मात्र त्यांनाही शाळांमध्ये स्थान नाही. त्यामुळे पालकांचाही कल पाटय़ांच्या खरेदीकडे नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. याबाबत पेन्सिलींचे दहिसर येथील संदीप पेन्सिल्सचे उत्पादक अ‍ॅड. राजेश खाडे यांनी सांगितले, ‘मी १९८४ पासून या व्यवसायात आहे. पेन्सिलींची मागणी गेल्या चार ते पाच वर्षांत झपाटय़ाने कमी होत गेली आहे. पूर्वी वर्षांला साधारण ७५ ते ८० हजार खोक्यांची विक्री व्हायची. मात्र ती आता ३० ते ३५ हजारांवर आली आहे. ही मागणी देखील ग्रामीण भागांतून अधिक आहे. खडूंची मागणी आता थोडी वाढली आहे. मात्र ‘डस्टलेस’ खडूंसाठी मागणी आहे.’ भावनगर येथील राजा स्लेटचे उत्पादक संदीप पटेल यांनी सांगितले, ‘दगडी पाटी आता वापरली जात नाही. शाळेत जाणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे पुठ्ठय़ाच्या पाटीला अजून ग्रामीण भागांतून मागणी आहे.’

पाटीची वंशावळ
पाटीची ओळख ही दगडी पाटीने झाली. त्यानंतर जाड पुठ्ठा किंवा कार्डबोर्डला काळा रंग देऊन त्याच्या पाटय़ा बाजारात आल्या. त्यानंतर मणी असलेल्या पाटय़ा, दुमडता येणाऱ्या दुहेरी पाटय़ा असे पाटय़ांचे स्वरूप बदलत गेले. आता मॅजिक स्लेटला प्राधान्य दिले जात आहे.

पाटीला नकार का?
शाळांमध्ये पाटी का नाही याबाबत शिक्षकांनी काही गमतीदार कारणे नमूद केली.
* पाटीचे वजन जास्त असते, त्यामुळे दप्तराचे वजन वाढते
* वह्य़ांमधील मजकूर टिकतो
* विद्यार्थी पाटय़ांनी मारामारीही करतात, त्याने इजा होऊ शकते.
* पेन्सिलीमुळे हात खराब होतो. त्याचप्रमाणे मुले पेन्सिली खातात
* पाटीवर लिहिणे, ती स्वच्छ करणे यांत अधिक वेळ जातो.

 

First Published on June 15, 2016 3:04 am

Web Title: notebook and pensil use in pre primary schools