वॉर्डस्तरीय निधीतून जी कामे केली जातात त्या फलकांवर सौजन्य वा संकल्पना म्हणून नगरसेवकांची नावे रंगवू नयेत, या मागणीकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील शेकडो नव्या कोऱ्या फलकांवर चिकटपट्टय़ा लावण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे. प्रभागातील प्रत्येक विकासकामाच्या ठिकाणी स्वत:चे नाव लावण्याचा आग्रह नगरसेवक धरत असल्यामुळे सर्व फलकांवरील नावे झाकावी लागत आहेत.
नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून शहरात अनेक विकासकामे केली जातात. अशा प्रत्येक ठिकाणी नगरसेवक फलक लावण्याचा आग्रह धरतात आणि त्यावर संकल्पना वा सौजन्य म्हणून स्वत:चे नाव लिहून घेतात. महापालिकेच्या फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर जी नवी पालिका अस्तित्वात आली, त्यावेळी नगरसेवकांची नावे रंगवण्याचा हा प्रकार बंद करावा, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली होती. तसेच महापालिकेच्या निधीतून केल्या जाणाऱ्या कामांवर संकल्पना वा सौजन्य म्हणून स्थानिक नगरसेवकांच्या नावाचे फलक लावू नयेत. कारण कोणतीही निवडणूक जाहीर झाली आणि आचारसंहिता लागू झाली की शहरातील सर्व फलक झाकावे लागतात. त्यामुळे फलकांवर नावे रंगवण्याचा प्रकार बंद करावा, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनीही महापालिका आयुक्तांना दिले होते.
प्रत्यक्षात असे पत्र दिल्यानंतर तसेच स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या मागणीनंतरही प्रशासनाने, तसेच पदाधिकारी आणि नगरसेवकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रत्येक निवडणूक आली की, सगळे फलक झाकण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो आणि आचारसंहिता संपली की, ते पुन्हा रंगवण्यासाठी देखील मोठा खर्च होतो. तसेच फलकांवरील नावे झाकताना ते खराबही होतात. त्यामुळे फलकांवर कोणाचेही नाव रंगवू नये, असे संस्थांचे म्हणणे होते. या मागणीनंतरही नगरसेवकांनी मात्र गल्लीबोळांना, छोटय़ा-मोठय़ा रस्त्यांना दिलेल्या नावांपासून ते लहान-मोठय़ा सर्व विकासकामांपर्यंत प्रत्येक ठिकाणी स्वत:चे नाव संकल्पना म्हणून कसे येईल याचीच काळजी घेतली आहे. रस्त्यांची नावे, दिशादर्शक फलक, सोसायटय़ांना दिलेली नावे, मार्गदर्शक नकाशे यासह जिथे जिथे म्हणून महापालिकेचे फलक आहेत तेथे तेथे स्थानिक नगरसेवकाचे नाव आहेच.
शहरात अलीकडेच लाखो रुपये खर्च करून मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत. विशेषत: गेल्या वर्षभरात तर सर्व प्रभागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर फलक लागले आहेत. या सर्व फलकांवर नगरसेवकांची नावे असल्यामुळे अशा किमान दीड-दोन हजार फलकांवरील नावे आचारसंहितेमुळे झाकावी लागली असून हे सर्व फलक त्यामुळे खराब होणार हे स्पष्ट झाले आहे.