प्रभात, भांडारकर रस्ता परिसरातील रहिवाशांना रस्ते रुंदीकरणासाठी नोटिसा

पुणे : शहरातील ३३५ रस्ते ९ मीटर रुंदीचे करण्याचे प्रस्तावित असताना मोठे रस्ते अरुंदच ठेवत गल्ली-बोळातील रस्त्यांवर घाला घालण्याचा प्रकार महापालिकेकडून सुरू झाला आहे. याअंतर्गत प्रभात आणि भांडारकर रस्ता परिसरात असलेल्या गल्ल्यांमधील रस्ते ९ मीटर रुंदीचे करण्यासंदर्भात महापालिकेकडून रहिवाशांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाविरोधात प्रभात रस्ता आणि भांडारकर रस्ता परिसरातील नागरिक एकवटले आहेत.

प्रभात रस्ता परिसरातील दहा गल्ल्यांमधील ६ मीटर रुंदीचे रस्ते ९ मीटर करण्यात येणार आहेत. तसेच भांडारकर रस्ता परिसरातील गल्ल्यांमधील रस्त्यांचे रुंदीकरणही प्रस्तावित आहे. याविरोधात नागरिकांनी महापालिकेकडे हरकती-सूचना दिल्या आहेत. गल्लीबोळातील रस्त्यांवर हरित कवच आहे. हा भाग शांत असून गल्लीबोळातील रस्त्यांवर वाहतुकीचा ताण नाही. रस्ता रुंदीकरणामुळे वृक्षराजी नष्ट करावी लागणार आहे. काही सोसायटय़ांमधून रस्ते जाण्याची भीती आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण नको, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे. मात्र हा विरोध डावलून रस्ता रुंदीकरणाचा घाट महापालिकेने घातला आहे. प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १४ या गल्ल्यांमधील रस्ता रुंदीकरण नियोजित आहे. तसेच भांडारकर रस्त्यावरील काही गल्ल्यांमधील रस्ता रुंदीकरणासंदर्भातही महापालिकेने संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली आहे. प्रभात रस्ता आणि भांडारकर रस्ता परिसरात मिळून जवळपास तीस गल्ल्या आहेत. या परिसरात अनेक सोसायटय़ा असून काहींचा पुनर्विकास झाला आहे.

शहरातील ६ मीटर रुंदीचे ३३५ रस्ते ९ मीटर करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्याबाबत जाहीर प्रकटन देण्यात आले असून हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत. अस्तित्वातील मोठे रस्ते रुंद करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावाही करण्यात आला होता. प्रत्यक्षात मोठे रस्ते सोडून गल्लीबोळातील रस्त्यांवर घाला घातला जात आहे. नागरिकांचा विरोध असताना आणि त्याबाबत हरकती नोंदविण्यात आल्यानंतरही रस्ता रुंदीकरणासंदर्भातील नोटिसा महापालिकेने दिल्या असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा घाट नक्की कोणासाठी घातला जात आहे, असा प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केला जात असून रस्ता रुंदीकरणाची ही प्रक्रिया वादग्रस्त ठरणार आहे. मुळातच वाहतूक नसलेल्या गल्लीबोळातील रस्त्यांचे रुंदीकरण का केले जात आहे, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

नोटिसा देण्याची अशीही पद्धत

महापालिकेने नोटिसा देतानाही त्या विचित्र प्रकारे दिल्या आहेत. गल्लीमधील एका ठिकाणी महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणाबाबतचे जाहीर प्रकटन, रस्त्यामध्ये बदल करण्याचा नकाशा चिकटविण्यात आला. काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास ही नोटीस आल्यामुळे रस्ता रुंदीकरणाची माहिती पुढे आली. त्यानंतर नागरिकांनी एकत्र येत रस्ता रुंदीकरणाबाबत चर्चा करून हरकती नोंदविल्या. रस्ता रुंदीकरणाला विरोध दर्शविला. मात्र, महापालिकेची नोटीस देण्याची विचित्र पद्धतही यानिमित्ताने पुढे आली.

नागरिक म्हणतात

’ प्रभात रस्ता आणि भांडारकर रस्ता एकेरी करावा

’ रुंदीकरणानंतर गल्लीतील काही सोसायटय़ांमधून रस्ता जाण्याची भीती

’ गल्ल्यांमधील झाडे तोडावी लागणार

’ काही रस्त्यांना पुढे जोड रस्ता नाही. तेथे रस्ता रुंदीकरण नको

’ विश्वासात न घेता रस्ता रुंदीकरणाचा घाट

गल्लीबोळातील रस्त्यांचे रूंदीकरण करणे आवश्यक नसतानाही त्याबाबतची कार्यवाही महापालिके ने सुरू के ली आहे. त्याला सर्वच नागरिकांचा विरोध आहे. या निर्णयामुळे अनेक सोसायटय़ांमधील पार्किं गची जागा जाण्याची भीती आहे. मुळातच वाहतूक नसतानाही रस्ते रूंदीकरण करणे चुकीचे आहे.

– विजय परदेशी, अध्यक्ष, शुभंकर सोसायटी, भांडारकर रस्ता, गल्ली क्रमांक १४