सणासुदीच्या तोंडावर मिठाई उत्पादकांना उत्पादनाच्या दर्जाबद्दल जागरुक व्हावे लागणार आहे. शहरातील दोनशे अन्न उत्पादकांना अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीचा आराखडा अन्न व औषध प्रशासनाकडे सादर करण्याबद्दल नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात मिठाई आणि बेकरी उत्पादकांना प्राधान्याने नोटिसा देण्यात आल्या आहेत.
या उत्पादकांना पंधरा दिवसांत हा आराखडा सादर करावा लागणार आहे. अन्न विभागाचे सहायक आयुक्त शिवाजी देसाई म्हणाले, ‘‘अन्न व्यावसायिकांनी एफडीएचा परवाना घेताना प्रशासनाकडे अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली आराखडा सादर करणे बंधनकारक असते. या आराखडय़ात अन्न व्यावसायिकांना कच्च्या मालाची खरेदी, अन्न प्रक्रिया, उत्पादन, साठवणूक, वितरण, पुरवठा सेवा यांबरोबरच अन्नाचा दर्जा सिद्ध करण्यासाठी प्रयोगशाळा तपासणीचे निष्कर्षही प्रशासनाकडे सादर करावे लागतात. अन्न उत्पादनाशी निगडित स्वच्छता व आरोग्य सुविधा, कीटक नियंत्रण याबद्दलची माहितीही या आराखडय़ात भरावी लागते. उत्पादनाची एखादी बॅच खराब निघाल्यास बाजारातून ती बॅच काढून घेण्याबाबत उत्पादकाकडे काय यंत्रणा आहे, अशा गोष्टींचा यात समावेश आहे.’’
या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनाही नोटिसा बजावण्यात येणार आहेत. हा आराखडा अन्न उत्पादक स्वत: सादर करू शकतात किंवा फूड  सेफ्टी ऑथॉरिटीच्या मान्यताप्राप्त संस्थांकडूनही आराखडा तयार करून घेता येऊ शकतो.
अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या शेडय़ूल- ४ मध्ये अन्न उत्पादकांनी पाळायच्या स्वच्छता आणि टापटिपीविषयक सूचनांचा समावेश आहे. या उत्पादकांनी उत्पादनाशी निगडित त्रुटी दूर करून आपला दर्जा आयएसओ दर्जापर्यंत उंचावावा, असे कायद्यात म्हटले आहे.