महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची कारवाई

मेडिकल कौन्सिलच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करण्यासाठी बनावट प्रमाणपत्र आणि गुणपत्रक जोडणाऱ्या तब्बल अठ्ठेचाळीस डॉक्टरांना कौन्सिलतर्फे नोटीस बजावण्यात आली आहे.

एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर अतिरिक्त पदवी घेणाऱ्या डॉक्टरांनी मेडिकल कौन्सिलकडे प्रमाणपत्रासह गुणपत्रक देणे बंधनकारक असते. त्यानंतर कौन्सिलकडून अतिरिक्त पदवीबाबतचे प्रमाणपत्र डॉक्टरांना दिले जाते. या प्रमाणपत्रानंतर या डॉक्टरांना रुग्णालयात वैद्यकीय सेवा करण्याची तसेच शल्यचिकित्सा करण्याची परवानगी मिळते. राज्यातील अठ्ठेचाळीस डॉक्टरांनी कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन्स या महाविद्यालयाची परीक्षा न देता अतिरिक्त पदवी नोंदणीसाठी मेडिकल कौन्सिलला बनावट प्रमाणपत्रासह गुणपत्रके सादर केली आहेत. या प्रकरणात कागदपत्रांची संपूर्ण छाननी आणि सुनावणी करून निर्णय घेतला जाणार आहे. मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी ही माहिती दिली.

डॉ. उत्तुरे म्हणाले, गेल्या वर्षी बनावट पदवी घेऊन कौन्सिलकडे प्रमाणपत्र सादर करण्यात आली होती. अनेकांनी या पदव्या तब्बल पाच लाख रुपयांना विकत घेतल्याचे निदर्शनास आले होते. बनावट पदवी असलेल्या सर्व डॉक्टरांना निलंबित करण्यात आले होते. मुंबईतील पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आणखी काही डॉक्टरांनी बोगस पदवी दिल्याचा संशय आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये अठ्ठेचाळीस नवीन डॉक्टरांना नोटीस पाठवण्यात आली आहे. संबंधित डॉक्टरांनी त्यांची मूळ कागदपत्रे सादर करण्याच्या सूचनाही नोटिशीतून देण्यात आल्या आहेत.