व्यवस्थापन आणि औषधनिर्माण शास्त्र शाखेच्या परीक्षांसाठी बारकोडची पद्धत यशस्वी ठरल्यानंतर आता पुणे विद्यापीठाच्या पुढील सर्व परीक्षांसाठी बारकोड पद्धती लागू करण्याचा विचार विद्यापीठ प्रशासन करत आहे, अशी माहिती विद्यापीठाचे महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी शनिवारी दिली.
पुणे विद्यापीठाने यावर्षी प्रथमच व्यवस्थापन आणि औषधनिर्माण शाखेची पदव्युत्तर परीक्षा, शिक्षणशास्त्र शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर या परीक्षांसाठी बारकोड पद्धत राबवली होती. या परीक्षांसाठी बारकोड पद्धत यशस्वी ठरल्यानंतर आता विद्यापीठाच्या सर्वच परीक्षांसाठी बारकोड पद्धत सुरू करण्याचा विचार विद्यापीठाकडून केला जात आहे.
पुणे विद्यापीठाच्या मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून प्राध्यापकांच्या बहिष्काराचा निकालावर काहीही परिणाम झाला नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले. आतापर्यंत जैवतंत्रज्ञान, संगणक शास्त्र या विषयांचे पदवीचे, विधी शाखेचे, शिक्षणशास्त्र पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे, व्यवस्थापन शाखा, औषधनिर्माण शास्त्र आणि विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमएससी) ९ विषयांचे निकाल जाहीर झाले आहेत. अभियांत्रिकी शाखेचे निकाल जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून जाहीर होणार आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.