चित्रपटगृहात गेल्यानंतर तिकिटे न मिळाल्यास होणारी चिडचिड होणार नाही, दर दहा मिनिटांना आपल्या आवडत्या चित्रपटाचे खेळ उपलब्ध होऊ शकतील, इतके स्क्रीन्स असतील, ‘व्हीआयपी’ चित्रपटगृहांत ‘रेकलायनर’ खुच्र्यावर बसल्या-बसल्या चेहरा पुसण्यासाठीच्या ‘हॉट टॉवेल’ पासून पॉपकॉर्नपर्यंतच्या सेवा आपल्या दिमतीला हजर असतील. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे आल्यानंतर चित्रपटगृहांचा कायापालट झाला, असे म्हणताना आता ‘मेगाप्लेक्स’ संस्कृतीने पुण्यात मूळ धरले आहे. येत्या चार वर्षांत देशात या उद्योगात जवळपास एक हजार कोटींची गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे.
मगरपट्टा सिटीमधील सीझन्स मॉल येथे ‘सिनेपोलिस’ या मेगाप्लेक्सचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. एकाच ठिकाणी असलेल्या ३ व्हीआयपी आणि इतर १२ अशा एकूण १५ चित्रपटगृहांचा या मेगाप्लेक्समध्ये समावेश आहे. सिनेपोलिस कंपनीचे भारतातील प्रमुख आशिष शुक्ला, कार्यकारी आणि धोरणविषयक प्रमुख देवांग संपत, मगरपट्टा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, सीझन्स मॉलचे संचालक शिरीष मगर या वेळी उपस्थित होते.
संपत म्हणाले, ‘‘२०१७ पर्यंत देशात ५०० चित्रपटगृहे कंपनीतर्फे बांधली जाणार असून यांतील प्रत्येक चित्रपटगृहामागे (प्रत्येक स्क्रीनमागे) २ ते २.५ कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. दहा लाख लोकसंख्येच्या शहरांचा मेगाप्लेक्स उभारण्यासाठी प्राधान्याने विचार होत असून अशा चाळीस शहरांत शिरकाव करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. देशात मल्टिप्लेक्स उद्योगाचा विकास दर १८ ते २० टक्के आहे. पुण्यात या उद्योगाच्या वाढीस भरपूर संधी असून मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांतील दररोज सरासरी २५ ते ३५ टक्के खुच्र्या भरल्या जातात. मगरपट्टा सिटीनंतर पुण्यात इतर ठिकाणीही मेगाप्लेक्स उभारण्यासाठी कंपनीची बोलणी सुरू आहेत. ठाण्यातही लवकरच सिनेपोलिसचे मेगाप्लेक्स सुरू करण्यात येणार आहे.’’
शनिवारपासून महरपट्टा सिटीतील मेगाप्लेक्स सुरू होणार असून पहिले काही दिवस व्हीआयपी चित्रपटगृहांच्या तिकिटांचे दर १५० ते ३०० रुपये तर साध्या चित्रपटगृहांतील तिकिटांचे दर ७० रुपयांपासून ठेवण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. केवळ चित्रपट दाखवणे हे आजच्या मल्टिप्लेक्स उद्योगाचे उद्दिष्ट नसून इतर आकर्षक सेवा-सुविधा पुरवण्यास अधिक महत्त्व असल्याचे शुक्ला यांनी स्पष्ट केले.