News Flash

आजवर आठ मुख्यमंत्री पाहिले, आत्ताच आरोप कसे?; एकनाथ खडसेंचा सवाल

आता शून्यातून विश्व निर्माण करेन

पुणे : पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ खडसे.

“जीवनगौरव पुरस्कार मिळणं म्हणजे करियर संपले असे नाही तर ती कामाची पोचपावती आहे. मात्र, काहींना असे वाटत असले तरी आता खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली असून आता शून्यातून विश्व निर्माण करेन,” असे विधान माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी पुण्यात केले. मात्र, या सूचक विधानामुळे त्यांनी आगामी काळात महाराष्ट्रात काही राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या संस्थेतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना प्रदान करण्यात आला. दरम्यान, पुरस्काराला उत्तर देताना खडसे म्हणाले, माझ्या राजकीय कारकिर्दीत मी आजवर ८ मुख्यमंत्री पाहिले आहेत. त्यांच्याकाळात माझ्याविरोधात कधी काही घडले नाही. मात्र, आत्ताच एक वर्षापासून काय मागे लागले आहे. या सर्व आरोपांतून मी निर्दोष सुटणार असून अजून किती आरोप माझ्यावर होत आहेत याचीच वाट पाहतोय. त्यामुळे कोणाला किती ओरडायचेय ते ओरडू द्या. मी प्रामाणिकपणे काम करीत आहे आणि यापुढेही करीत राहणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, जेव्हा माणूस करियरच्या अत्युच्च बिंदूवर असतो तेव्हा त्याला हा पुरस्कार देण्यात येतो. शिवाय मी पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असल्याने माझे करियर अद्याप संपलेले नाही. उलट माझ्या करियरला आता कुठे सुरुवात झाली आहे असे मी मानतो.

पेट्रोल-डिझेल दरवाढीवर सरकारची भुमिका काय? या प्रश्नावर बोलताना खडसेंनी याचे खापर मागील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारवर फोडले. ते म्हणाले, सध्या जे कर आहेत त्यात भाजप सरकारने कोणताही नवा कर लादला नसून आधीच्या सरकारनेच लावलेले हे कर आहेत.

दरम्यान, जीवनगौरव पुरस्कार प्रदान केल्यानंतर बोलताना खडसे म्हणाले, भाजपची काही काळापूर्वी ब्राह्मणांचा पक्ष अशी ओळख होती. मात्र, आता सर्वसमावेशक पक्ष म्हणून भाजपची ओळख झाली आहे. आज पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे असते तर राज्यातील राजकारणाची दिशा वेगळी असती असे ते म्हणाले. गोपीनाथ मुंडेंची आठवण काढताना त्यांना गहिवरुन आले. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल सुरु झाली असून ती अशीच कायम राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना ते म्हणाले, राजकारणात जोवर चांगल्या व्यक्ती येत नाहीत तोवर येथील परिस्थिती बदलणार नाही. परिस्थितीतील स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. निर्वासितांबाबत बोलताना खडसे म्हणाले, भारतात सध्या कोणीही परदेशी व्यक्ती येऊन राहू लागली आहे. धर्मशाळा असल्यासारखे हे झाले आहे. त्यामुळे त्यांना नागरिकत्व देण्यात येऊ नये. भारतीय सीमांवर अशा लोकांच्या येण्या-जाण्यावर बंदी आणावी अशी मागणी आपण यापूर्वी केली असल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 1:47 pm

Web Title: now create a new world from zero says eknath khadse at pune
Next Stories
1 भोसरीत तरूणावर गोळीबार; शहरात २४ तासातील दुसरी घटना
2 खासदार काकडे यांच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
3 बंद सहकारी साखर कारखाने शासन घेणार
Just Now!
X