राज्यातील टोल नाक्यांवर लागलेली वाहनांची रांग हे दृश्य आता दिसणार नाही. टोल भरण्यासाठी स्मार्ट कार्डचा वापर करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून तीन महिन्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. हे स्मार्ट कार्ड गाडीच्या दर्शनी भागातील काचेवर लावायचे. गाडी टोल नाक्यावरून गेली की त्याची नोंद होऊन टोलची रक्कम संबंधित गाडीमालकाच्या स्मार्ट कार्ड खात्यातून वजा होईल, अशी सुविधा त्यामध्ये असेल.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये झालेल्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी’च्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पत्रकारांना दिली. राज्यातील आठ मंत्र्यांचा समावेश असलेल्या या समितीला कॅबिनेटचा दर्जा आहे, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले,की राज्यामध्ये ठिकठिकाणी टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. यामध्ये वाहनचालकांचा वेळेचा अपव्यय होतो. अनेक वाहनांमधील पेट्रोल वाया जाते. त्याचप्रमाणे प्रदूषणामध्येही भर पडते. वाहनचालकांनाही त्याचा त्रास होतो. त्यामुळे ‘मल्टिपर्पज स्मार्ट कार्ड’ ही योजना लवकरात लवकर सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कार्ड गाडीच्या दर्शनी भागातील काचेला लावायचे. टोलनाक्यावरून गाडी गेली की त्या वाहनचालकाच्या स्मार्ट कार्डवरील खात्यातून आपोआप टोल रकमेची वजावट होईल.
रस्ते मोठे झाले असले तरी, टोलनाक्यांची संख्या वाढविण्यासाठी वेगळी जमीन घेणे शक्य होणार नाही. सध्या जमिनींना चांगला दर मिळत असल्या कारणामुळे कोणी जमीन देण्यासही तयार होत नाही. ही बाब ध्यानात घेऊनच स्मार्ट कार्डचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. आगमी तीन महिन्यांत ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा धोरणात्क निर्णयही या बैठकीमध्ये घेण्यात आला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.