नेत्यांचे खतपाणी असल्याने पिंपरी भाजपमध्ये गटबाजीच्या राजकारणाने चांगलाच जोर धरला आहे व त्यामुळे पक्षसंघटनेचा पुरता विचका झाल्याचे चित्र पुढे आले आहे. प्रतिकूल परिस्थितीत नवे शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांना यापुढील काळात कडव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. वातावरण थोडे थंड पडल्यानंतर उसंत मिळालेल्या खाडेंनी आता बांधणीला सुरुवात केली आहे. आपण शहराध्यक्ष असलो, तरी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सामुदायिक नेतृत्वाची संकल्पना राबवणार असून पक्षात यापुढे ‘मॅचफिक्सिंग’चे राजकारण होणार नसल्याचा दावा खाडेंनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला आहे.
खाडे म्हणाले, महायुतीतील घटक पक्षात समन्वय ठेवणे, महायुती बळकट करणे, पक्षातील नव्या व जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवणे, बूथरचना, नवीन मतदार नोंदणी, पदवीधर नोंदणीच्या कामाला गती देणे आदी कामांना प्राधान्य राहणार आहे. पक्षात काही प्रमाणात कुरबुरी आहेत, मतभेद आहेत. मात्र, गटबाजी नाही. भाजप हाच एकमेव गट आहे. विरोधकांकडून होणारी टीका पेल्यातील वादळ आहे. अंतर्गत वादावर तोडगा काढण्याचे काम विरोधी पक्षनेते विनोद तावडे करणार आहेत. सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याचे, सामुदायिक नेतृत्व प्रस्थापित करण्याचे आपले धोरण राहणार आहे. जनमानसात नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आहे. त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवल्याचा फायदा पक्षवाढीसाठी होतो आहे. अनेक नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. आगामी काळात पक्षसंघटन आणखी मजबूत होणार आहे.
लोकसभेचे मावळ व शिरूर मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत, त्यात फेरबदल होण्याची शक्यता नाही. विधानसभा मतदारसंघांची अदलाबदल, संभाव्य उमेदवार हे विषय प्रदेशस्तरावर चर्चिले जातील. महापालिकेतील चुकीच्या कामांना भाजपचा विरोध राहणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वेळ प्रसंगी रस्त्यावर येऊ. विरोधकांशी साटेलोटे असण्याचा प्रश्चच नाही. यापुढे ‘मॅचफिक्सिंग’ होणार नाही. मैत्री व राजकारण हे दोन्ही विषय वेगळे असून पक्षहित सर्वाधिक महत्त्वाचे आहे.