पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या सर्व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती माहितीच्या अधिकारामध्ये विद्यार्थ्यांना आता मिळणार आहेत. मात्र, मिळालेल्या छायाप्रती विद्यार्थ्यांनी कुणाला दाखवू नयेत, विद्यापीठाच्या लौकिकाला धक्का बसेल असा गैरवापर करू नये, अशा गमतीदार अटी विद्यापीठाने घातल्या आहेत.
पुणे विद्यापीठामध्ये आतापर्यंत फक्त तीनच विषयांच्या उत्तरपत्रिका मिळण्यासाठी अर्ज करता येत होते. मात्र, बदललेल्या नियमांनुसार आता विद्यार्थी त्यांना हव्या तेवढय़ा विषयांच्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती माहिती अधिकारामध्ये मागू शकतात. विद्यार्थ्यांना सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळाव्यात यासाठी सजग नागरिक मंचाकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. या मागणीच्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाने नियमांमध्ये आता बदल केले आहेत. त्याचप्रमाणे, छायाप्रतीसाठी अर्ज केल्यानंतर दहा दिवसांमध्ये ती देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतानाच काही अटीही विद्यापीठाने लादल्या आहेत. विद्यार्थ्यांना मिळालेल्या छायाप्रती त्यांनी कुणाला दाखवू नयेत किंवा देऊ नयेत. विद्यापीठाच्या लौकिकाला धक्का बसेल अशाप्रकारे छायाप्रतींचा वापर करू नये, अशा काही अटी विद्यापीठाने घातल्या आहेत, अशी माहिती सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी दिली. विद्यापीठाने घातलेल्या या नव्या अटी माहिती अधिकार कायद्याचा भंग करत असल्याचेही वेलणकर म्हणाले.
परीक्षेचा निकाल लागल्यानंतर दहा दिवसांच्या कालावधीमध्येच उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करावेत, ही अटही विद्यापीठाने कायम ठेवली आहे. मात्र, जोपर्यंत विद्यापीठामध्ये उत्तरपत्रिका जपून ठेवल्या जातात, तोपर्यंत त्या केव्हाही मागण्याचा विद्यार्थ्यांना अधिकार आहे. त्यामुळे विद्यापीठाने या नियमातही बदल करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.