चीन आणि युरोपनंतर आता आपल्या देशात काचेच्या भिंतीपासून सौर ऊर्जा निर्माण करणारा प्रकल्प, पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उदघाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात ऊर्जा अभ्यास प्रणाली विभागात काचेच्या भिंती पासून सौर ऊर्जा निर्माण करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या केंद्राच्या चार ही भिंतींवर काचा बसवण्यात आल्या आहेत. या प्रकल्पातून दररोज साधारण १४ युनिट उर्जा निर्मिती होणार आहे.

या प्रकल्पाबाबत अनिस पिंपळखुटे म्हणाले की, मागील काही वर्षापासून परदेशात काचेच्या भिंतीपासून सौर ऊर्जा निर्माण केली जात आहे. तेथील तंत्रज्ञानाचा अभ्यास करीत, आता आपल्या देशात देखील काचेमधून सौर ऊर्जा निर्माण करण्याचा प्रकल्प पुणे विद्यापीठात उभारला गेला आहे. यातून निर्माण होणारी काही वीज विद्यापीठाला दिली जाणार आहे. तसेच भविष्यात देशातील अनेक ठिकाणी असे प्रकल्प दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.