शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये गुरुवारपर्यंत ९.६८ टीएमसी इतका पाणीसाठा झाल्यामुळे शहरातील एक दिवसाआड पाणीपुरवठय़ाचा निर्णय रद्द करण्यात आला असून रोज एक वेळ पाणी देण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. महापालिकेत झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर चंचला कोद्रे यांनी सांगितले. या निर्णयानुसार शुक्रवार (२५ जुलै) पासून रोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू होईल.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांच्या क्षेत्रात जुलैच्या मध्यानंतरही पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात २८ जून पासून १२ टक्के पाणीकपात करण्यात आली होती. या कपातीमुळे शहरात एक वेळ पाणीपुरवठा केला जात होता. या पाणीकपातीनंतरही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पाणीसाठा आणखी कमी झाला होता. त्यामुळे १४ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या क्षेत्रात गेले चारपाच दिवस चांगला पाऊस सुरू असून धरणांमध्ये ९.६८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
धरणांच्या पाणीसाठय़ात वाढ झाल्यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा रद्द करून रोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून होत होती. पाणीसाठय़ाचा तसेच सद्यपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर चंचला कोद्रे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पक्षनेत्यांची बैठक झाली. या बैठकीत एक दिवसाआड पाणीपुरवठय़ाचा निर्णय रद्द करण्यात आला. या निर्णयानुसार शुक्रवार (२५ जुलै) पासून शहरात रोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू होईल. रोज एक वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका १,१०० दशलक्ष लिटर पाणी धरणातून घेत होती. तेवढे पाणी आता घेतले जाईल. त्या वेळी संपूर्ण शहरासाठी एक वेळ पाण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्या वेळापत्रकानुसारच शुक्रवारपासून पाणीपुरवठा केला जाणार आहे.
धरणांच्या क्षेत्रात पुढील काळात चांगला पाऊस झाल्यानंतर तसेच पुरेसा पाणीसाठा झाल्यानंतर पाणीकपात बंद करून शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, असे महापौर चंचला कोद्रे यांनी सांगितले.