News Flash

अनिवासी भारतीयांच्या पालकांना ‘नृपो’चा मदतीचा हात

आपल्या जगण्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक पैलूशी समाजमाध्यमांनी स्वतला जोडून घेतलेलं पहायला मिळतं.

(संग्रहित छायाचित्र)

करीअरच्या नवनवीन संधी मिळवण्यासाठी देशाबाहेर जाणं अनेकदा अनेक तरुणांसाठी अपरिहार्य ठरतं. आई-वडील आपलं घरदार सोडून परदेशात स्थायिक होण्यासाठी तयार नसतात, त्यामुळे परदेशात करीअर करण्याची शिकस्त, तिथल्या राहणीमानाशी जुळवून घेणं अशी अनेक आव्हानं तरुण मुलांना पेलावी लागतात, पण मनात कुठेतरी घरी एकटय़ा असलेल्या आई-वडिलांची काळजी सुद्धा असते. परदेशात वास्तव्य करणाऱ्या तरुण मुलामुलींच्या पालकांसाठी मदतीचा हात म्हणून सुरू झालेली नृपो ही संस्था आता समाज माध्यमांच्या वापरातून जास्त अ‍ॅक्टिव्ह आणि वेगवान होताना दिसत आहे.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर अशा समाजमाध्यमांनी आपल्या दैनंदिन जगण्यात आमूलाग्र म्हणता येईल अशी मोलाची भर घातली आहे. आपल्या जगण्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक पैलूशी समाजमाध्यमांनी स्वतला जोडून घेतलेलं पहायला मिळतं. समाजमाध्यमांचा असाच आगळा वेगळा पण परिणामकारक वापर ‘नॉन रेसिडेंट इंडियन्स पॅरेन्टस् ऑर्गनायझेशन’(नृपो) या संस्थेनं करण्यास सुरवात केली आहे.

उच्चशिक्षणासाठी तसेच नोकरीच्या निमित्ताने ज्यांची मुलं परदेशात जातात त्या मुलांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी तसेच निरनिराळ्या कारणांमुळे परावलंबी असलेल्या आजी-आजोबांना मदतीचा हात देऊन त्यांचा एकटेपणा दूर करण्यासाठी ‘नॉन रेसिडेंट इंडियन्स पॅरेन्टस् ऑर्गनायझेशन’(नृपो) ही संस्था १९९४ पासून काम करते. समाजमाध्यमं जशी आली तशी संस्थेची वाटचाल वेगवान झाली हे साहजिकच आहे. उतार वयात ज्येष्ठांना भेडसावणारे मानसिक प्रश्न, मनात डोकावणारे नकारात्मक विचार, ताणतणाव, नात्यांमधील वाढतं अंतर, एकटेपणा यांसारख्या समस्यांचं गांभीर्य दिवसेंदिवस मोठे आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या अशा अनेक प्रश्नांकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन न्यायमूर्ती नारायण अभ्यंकर यांनी १९९४ मध्ये ‘नृपो’ची स्थापना केली.

संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार स्वादी म्हणाले, अनिवासी भारतीयांच्या पालकांना दैनंदिन देखभाल, वैद्यकीय मदत, परदेशी प्रवासासाठी  मार्गदर्शन, व्हिसा पासपोर्ट मिळवणे, आरोग्य विमा, हवाई तिकिटे, मालमत्ता व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था यांसारख्या विविध कामांसाठी मदत केली जाते. यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे एकटय़ा व्यक्तींना मानसिक आधार देण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते. नृपो संस्थेला शहरातील अनेक  रुग्णालये जोडली गेली असून रात्री-अपरात्री, आपत्कालीन वेळी नृपोच्या सदस्यांना रुग्णालयातर्फे कॅशलेस वैद्यकीय सुविधा देखील देण्यात येते.

नृपोची सुरुवात ३० कुटुंबांपासून झाली. आता संस्थेशी ४०० कुटुंब जोडली गेली आहेत.

डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय केळकर, डॉ. अरुण निगवेकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. आशुतोष कोतवाल यांसारखी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेली मंडळी संस्थेची सदस्य आहेत. सध्या संस्थेचे २७ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत. संस्थेच्या सदस्यांना शहरातील विविध सदस्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या त्या ठिकाणी जाणे शक्य होत नाही. अशा वेळी या ग्रुपच्या माध्यमातून सदस्यांच्या समस्या, त्यांना भेडसावणारे प्रश्न, आवश्यक सुधारणा, तसेच संस्थेच्या कामकाजाविषयी चर्चा केली जाते. संस्थेकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे सर्व सदस्यांच्या समस्या कळतात. त्याचबरोबर सदस्यांच्या प्रश्नांचे त्वरित व योग्यरीतीने निरसन करण्यास मदत होत असल्याचे स्वादी यांनी सांगितले.

संस्थेच्या सदस्यांना भावनिक व मानसिक आधार देण्यासाठी वर्षभर विविध मनोरंजनात्मक आणि अन्य कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक समुपदेशन तसेच विविध क्षेत्रातील माहिती देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांचा व व्यक्तींचा सन्मान दरवर्षी करण्यात येतो. लेखन, साहित्याची आवड असणाऱ्यांना आपले अनुभव, विचार  मांडण्यासाठी ‘नृपोजगत’हे त्रमासिक प्रसिद्ध केले जाते. सामाजिक बांधीलकीची भावना जपत संस्थेतर्फे दरवर्षी निरपेक्ष भावनेने समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेचा सत्कार करण्यात येतो. संस्थेच्या अधिक माहितीसाठी  www.nripopune.orgया संकेतस्थळाला भेट देता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 2:12 am

Web Title: nripos help hand to parents of non resident indians
Next Stories
1 ‘कॉसमॉस’वर सायबर दरोडा
2 कॉसमॉस बँकेची ऑनलाइन, एटीएम सेवा तीन दिवस बंद राहणार, बँकेतून व्यवहार करण्याचे आवाहन
3 पुणे – मराठा आंदोलनादरम्यान हिंसाचार करणाऱ्या १७१ जणांची जामिनावर सुटका
Just Now!
X