नोव्हेंबर अखेपर्यंत १२३ जणांचा अपघाती मृत्यू

पुणे : शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असून वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात घडत आहेत. यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिना अखेरीपर्यंत १२३ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत अपघात तसेच मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी झाली असली तरी वाहनचालकांची बेशिस्ती कायम आहे.

शहरात वाहतूक नियमभंगाचे प्रमाण मोठे आहे. भरधाव वेगाने वाहन चालविणे, सिग्नल मोडणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे, मोबाइलवर संभाषण करणे अशा प्रकारांच्या नियमभंगामुळे वाहनचालकांना जीव गमवावा लागत आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत शहरात ३९२ अपघात झाले असून अपघातात १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वार तसेच मोटारचालकांकडून वाहतूक नियम धुडाकावण्यात येत आहेत. दुचाकी चालविताना हेल्मेट न वापरणे, मोटार चालविताना आसनपट्टा (सीटबेल्ट) न बांधण्याचे प्रमाण मोठे आहे. बहुसंख्य अपघात वाहनचालकांच्या चुकांमुळे झाल्याचे निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदविले आहे.

शहरात नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण मोठे असून देशातील अन्य शहरांच्या तुलनेत दुचाकी वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वाहतुकीचे नियम धुडकावण्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत असली तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी अपघातांचे तसेच अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे.

मुंबई-बंगळुरू बाह्य़वळण मार्ग शहरातील सर्वात धोकादायक मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर महिनाभरात गंभीर स्वरुपाचे पाच अपघात घडले आहेत. कोथरूड, बावधन, सिंहगड रस्ता, कात्रज, आंबेगाव या उपनगरातून बाह्य़वळण मार्ग जातो. बाह्य़वळण मार्गालगतच्या उपनगरात लोकसंख्या वाढत आहे.

वाहनचालकांनी स्वयंशिस्त तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चित कमी होईल. दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केल्यास अपघात होणारी दुखापत टाळता येईल. वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी वेळोवेळी जनजागृती मोहीम राबविण्यात येते. मात्र, वाहनचालकांकडून नियम धुडाकावले जातात. शहरातील अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करून तेथे सुधारणा करणे, तसेच अत्यावश्यक सूचनांचे फलक बसविण्याचे काम करण्यात येत आहे.

– राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा