लोहगाव विमानतळ विस्तारासाठी ६५० कोटींची गुंतवणूक

पुण्यातील लोहगाव विमानतळावर विमानांच्या उड्डाणांसह मागील तीन वर्षांत प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. २०१४-१५ मध्ये वार्षिक ४१ लाख प्रवासी संख्या आता ८२ लाखांवर पोहोचली आहे. वाढणाऱ्या प्रवासी संख्येमुळे विमानतळाच्या विस्तारीकरणावर सध्या भर देण्यात येत आहे. त्यासाठी ६५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यातील ४२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या नव्या टर्मिनलच्या उभारणीस मंजुरी मिळाली असून, मे महिन्यापर्यंत हे काम सुरू होऊ शकणार आहे.

विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष, खासदार अनिल शिरोळे, विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी याबाबतची माहिती दिली. शिरोळे यांनी सांगितले, की प्रवाशांची वाढती संख्या आणि आवश्यकता लक्षात घेऊन लोहगाव विमानतळावरून सध्या दिवसाला ८७ विमानांचे उड्डाण होते. विस्तारीकरणाच्या प्रकल्पानंतर विमानतळावर दहा विमाने एकावेळी हाताळता येतील. पुणे विमान तळासाठी लागणाऱ्या अतिरिक्त जागेसाठी पाठपुरावा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील पायभूत सुविधा समितीची बैठक महिनाभरात होईल. त्यामध्ये विमानतळाच्या प्रलंबित कामांबाबत निर्णय होईल. विमानतळासाठी अतिरिक्त जागा, आंतरराष्ट्रीय विमानांच्या धावपट्टीसाठी लागणारी जागा आणि नियोजित पुरंदर विमानतळाविषयी सकारात्मक निर्णय होईल. अजयकुमार म्हणाले, की येरवडा व विमाननगर येथून विमानतळावर येण्यासाठी नवीन रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. विमानतळावरून जगभरात मालाची निर्यात करणे यापुढे शक्य होणार असून, ३१ मार्चपासून ही सुविधा सुरू केली जाईल. विमानतळावरील प्रवाशांच्या आसनांची संख्याही सध्या वाढविण्यात आली आहे. पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी बहुमजली वाहनतळासाठी मार्चपर्यंत निविदा काढण्यात येतील.