चिन्मय पाटणकर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न शाळांची राज्यातील संख्या एक हजारावर पोहोचली आहे. राज्यातील एक हजार तीन शाळा सीबीएसईशी संलग्न असून त्यात सर्वाधिक शाळा पुणे जिल्ह्य़ातील आहेत. राज्यातील सीबीएसई संलग्न शाळांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

इंग्रजी माध्यमासह राष्ट्रीय प्रवेश परीक्षांसाठीचा पूरक अभ्यासक्रम, दहावी-बारावीचे वाढते निकाल आदी कारणांमुळे पालकांचा ओढा ‘सीबीएसई’च्या शाळांकडे वाढत असल्याचे दिसून आले आहे. अनेक जुन्या शाळाही राज्य मंडळाशी असलेली संलग्नता सोडून ‘सीबीएसई’शी संलग्न होण्यास उत्सुक आहेत.

‘सीबीएसई’शी संलग्न शाळांमध्ये खासगी शाळांचेच प्रमाण जास्त आहे. खासगी शाळा राज्य मंडळाच्या शाळांपेक्षा जास्त शुल्क घेत असूनही पालक ‘सीबीएसई’च्या शाळांना पसंती देतात. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्य़ांमध्ये ‘सीबीएसई’शी संलग्न शाळा आहेत. त्यात खासगी संस्थांच्या शाळांसह केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय या शासकीय शाळांचाही समावेश आहे.  गेल्यावर्षीपर्यंत राज्यातील शाळा ‘सीबीएसई’च्या चेन्नई विभागाच्या अखत्यारीत येत होत्या. मात्र, यंदाच ‘सीबीएसई’ने चेन्नई विभागाचे विभाजन करून स्वतंत्र पुणे विभागाची निर्मिती केली. पुणे विभागाअंतर्गत राज्यात एक हजार तीन शाळा असल्याची माहिती ‘सीबीएसई’च्या संकेतस्थळावर आहे.

गेल्या सात महिन्यांत जवळपास ६०पेक्षा जास्त शाळांनी ‘सीबीएसई’शी संलग्नता. शहरी भागांसह निमशहरी भागांतही ‘सीबीएसई’च्या शाळांकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच येत्या काळात राज्यातील शहरी भागांतील ‘सीबीएसई’ संलग्न शाळांची संख्या वाढत जाणार आहे.

जिल्हा    शाळांची संख्या

पुणे  १७५

नागपूर   ११३

ठाणे ७५

नगर ४८

मुंबई ४५

औरंगाबाद ४४

चंद्रपूर    ३९

जळगाव   ३९

जिल्हा    शाळांची संख्या

नाशिक   ३३

रायगड    २९

कोल्हापूर  २८

सोलापूर   २३

सांगली    २०

सातारा    २०

अमरावती २०

बुलढाणा २१

यवतमाळ १९