28 October 2020

News Flash

मुलाखत : मतदारांच्या तक्रारींचे प्रमाण यंदा अल्प

यंदा जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींची संख्या खूपच कमी आहे. तसेच पुण्यात मतदान यंत्रांसंबंधीच्या तक्रारीही नगण्य होत्या.

(संग्रहित छायाचित्र)

मतदानाच्या दिवशी मतदारयादीतून नावे वगळली गेल्याचे प्रकार समोर येतात. या आणि अशा अनेक तक्रारी निवडणुकीच्या मतदानाआधी आणि नंतरही सातत्याने होत असतात. पुणे, बारामती लोकसभा मतदार संघांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. मात्र, यंदा जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींची संख्या खूपच कमी आहे. तसेच पुण्यात मतदान यंत्रांसंबंधीच्या तक्रारीही नगण्य होत्या. पुणे शहरासह जिल्ह्य़ातील मतदारांची संख्या तब्बल ७५ लाख ४८ हजार ९५१ एवढी झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या अनुषंगाने एकूण तयारी आणि अंमलबजावणीबाबत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याशी साधलेला संवाद.

*    निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून कशाप्रकारे तयारी करण्यात आली होती?

पुणे जिल्ह्य़ातील चार लोकसभा मतदार संघांपैकी पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघांसाठी तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी मतदान पार पडले. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघांसाठी चौथ्या टप्प्यात येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीसाठी अत्यंत सूक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शासकीय विभागांचे प्रमुख, पोलीस प्रशासन यांच्यासोबत सातत्याने बैठका घेतल्या आहेत. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठकाही घेतल्या आहेत. पुणे, बारामती मतदार संघांतील मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक सुविधा देण्यात आल्या होत्या. तसेच मावळ, शिरूर मतदार संघांमधील मतदान केंद्रांवर देखील पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प अशा सुविधा देण्यात येणार आहेत.

*    निवडणुकीच्या अनुषंगाने कामांची रचना आणि कार्यवाही कशा पद्धतीने सुरू आहे?

निवडणूक विषयक विविध कामांसाठी पथके स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये खर्च देखरेख, छायाचित्रणकार, निरीक्षक, विभागीय अधिकारी, भरारी पथके, स्थिर पथके (एसएसटी), निवडणूक केंद्रातील गैरप्रकार रोखण्यासाठी व्हिडीओ चित्रीकरण आणि पाहणी पथक, लेखा पथक नियुक्त केली आहेत. सैन्यात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्स्मिटेड पोस्टल बॅलेट सव्‍‌र्हिस) सुविधेद्वारे मतपत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. याबरोबरच आचारसंहिता भंगाच्या नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे. या अ‍ॅपचा वापर निवडणूक अधिसूचनांच्या तारखेपासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. आतापर्यंत प्रशासनाला प्राप्त झालेल्या तक्रारींचा पाठपुरावा करण्यात आला आहे. तसेच नागरिकांकडून १९५० या क्रमांकावरून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे.

*    पुणे, बारामतीमधून काय स्वरूपाच्या तक्रारी आल्या?

पुणे, बारामतीमधून मतदानाबाबत नाममात्र तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातून मतदार यादीत नाव नसल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांपैकी काही मतदारांना प्रशासनाकडून नावे शोधून देण्यात आली. चुकीच्या पद्धतीने नाव वगळण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास, त्याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच दुबार मतदार असलेल्या मतदारांबाबत विशेष मोहीम आगामी काळात राबवण्यात येणार आहे. एकदोन मतदान केंद्रांवर मतदान सुरू असताना मतदान यंत्रे बिघडण्याचा प्रकार झाला. या केंद्रांवर तातडीने पर्यायी मतदान यंत्रे देण्यात येऊन मतदान सुरळीत करण्यात आले. याबरोबरच एका मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याने राजकीय पक्षाचा प्रचार केल्याची तक्रार प्रसारमाध्यमातून जिल्हा प्रशासनाला समजली. त्यानुसार संबंधित मतदान केंद्रातील सहायक निवडणूक अधिकाऱ्याला चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या चौकशीमध्ये गैरप्रकार निदर्शनास आल्यास पुढील कार्यवाही केली जाईल. मात्र, आतापर्यंत याबाबत अधिकृत तक्रार जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. श्री शिवाजी प्रीपरेटरी मिलिटरी स्कूल (एसएसपीएमएस) मतदान केंद्रात एका उमेदवाराचे बटण दाबल्यानंतर दुसऱ्याच उमेदवाराला मत पडत असल्याची तक्रार समोर आली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्वाचित अधिकारी आणि मतदान केंद्रातील प्रतिनिधींसमोर तक्रारदाराला मतदान करण्यास सांगितले. या मतदानात एक बटण दाबल्यानंतर दुसऱ्यालाच मत जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला नाही.

*    यंदा मतदार यादी तयार करताना काय काळजी घेतली होती?

जिल्हा निवडणूक शाखेकडून ३१ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार मतदारांची संख्या ७३ लाख ६९ हजार १४१ एवढी होती. त्यानंतर २३ आणि २४ फेब्रुवारी, तसेच २ आणि ३ मार्च रोजी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांद्वारे अर्ज केलेल्या मतदारांना पुरवणी यादीत समाविष्ट करण्यात आले. विशेष मतदार नोंदणीला शहर, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्य़ात चांगला प्रतिसाद मिळाला. मयत आणि ज्या मतदारांनी स्थलांतर झाल्याबाबत अर्ज केला आहे, अशाच मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे यंदा मतदारयादीत नाव नसल्याच्या तक्रारींना वाव राहिलेला नाही.

*   निवडणूक शाखेकडून मतदान जागरूकता कशाप्रकारे केली गेली?

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. मतदारांमधील जागरूकतेसंबंधी कार्यक्रम पुणे, बारामतीमध्ये राबवले गेले. तर, मावळ आणि शिरूरमध्ये सध्या सुरू आहेत. मतदान जनजागृती मोहीम, मतदान संकल्प पत्र वितरण, शाळा आणि महाविद्यालये, तसेच शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, संस्थांमध्ये मतदार साक्षरता मंचाची स्थापना, ग्रामपंचायत स्तरावर चुनाव पाठशालांचे आयोजन आदी उपक्रम करण्यात आले. दृक-श्राव्य माध्यमांचा वापर करून निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रचार करणे, दिव्यांग मतदारांचा शोध घेणे, दिव्यांग मतदारांची नोंदणी, दिव्यांग मतदारांना मतदानाप्रसंगी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, निवडणूक प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘सखी मतदान केंद्र’ आदी उपक्रम करण्यात आले.

मुलाखत – प्रथमेश गोडबोले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2019 1:49 am

Web Title: number of complaints of voters is lower
Next Stories
1 नाटक बिटक : रंगालय छोटेखानी रंगावकाश!
2 वाढत्या तापमानामुळे पुण्यात दुपारच्या सत्रात मतदानावर परिणाम
3 पुणे: बायको आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या
Just Now!
X