करोना प्रतिबंधक लस उपलब्ध होत नसल्यामुळे कोथरूडमधील एका रुग्णालयाने चक्क महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक असलेला फलक लावला होता. येथून क्रमांक घेऊन नागरिकांनी केलेल्या दोनशेहून अधिक दूरध्वनींमुळे त्रस्त झालेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णालयाविरुद्ध तक्रार केली आहे.

काही दिवसांपासून लशीचा तुटवडा जाणवत आहे. पुरेसा लससाठा उपलब्ध होत नसल्यामुळे काही रुग्णालयांवर लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र, नागरिक सातत्याने रुग्णालयांमध्ये चकरा मारत आहेत. या प्रकाराला वैतागून खासगी रुग्णालयात एका फलकाद्वारे महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक जाहीर केले आहेत. ‘या केंद्रावर आता लस उपलब्ध नाही. सरकार आणि पालिकेकडून लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण बंद आहे. अधिक माहितीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा,’ असा फलक कोथरूडमधील या रुग्णालयात लावण्यात आला होता.

पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातत्याने लशीसंदर्भात चौकशी करणारे दूरध्वनी येऊ लागले. वैतागलेल्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला तेव्हा या फलकामुळे हे घडत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधून चौकशी केली आणि रुग्णालयाविरोधात कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे.