राज्यातील शासकीय सेवेतील परिचारिकांच्या लढय़ाला- ‘महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन’ या त्यांच्या संघटनेला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. पूर्वी केवळ विनापाश महिलांचे क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिचर्या सेवेत संसारी स्त्रिया आल्या आणि हक्कासाठी भांडायला शिकल्या त्या लढय़ाची ही पन्नाशी आहे. संघटनेच्या अध्यक्ष अनुराधा आठवले यांनी या पन्नास वर्षांचे अनुभव ‘लोकसत्ता’शी बोलताना उलगडले.

तुम्ही या क्षेत्रात आलात तेव्हा परिचारिकांची स्थिती काय होती आणि त्यांच्या संघटनेची गरज कधी वाटली?
– पूर्वी या व्यवसायात विधवा, परित्यक्ता, प्रौढ कुमारिका आणि घटस्फोटिता या स्त्रिया प्रामुख्याने होत्या. परिचारिकांच्या भरतीसाठी येणाऱ्या जाहिरातीतही ‘विनापाश महिलांनी अर्ज करावेत’ असे नमूद केले जाई. या स्त्रियांवर बंधनेही पुष्कळ असत. ‘येस’ आणि ‘नो’ हे दोनच शब्द बोलायची त्यांना मुभा असे. मी मूळची बारामतीजवळच्या माळेगावची. तिथली एसएस्सीची पहिली विद्यार्थिनी. १९५५ मध्ये अकरावी पास झाल्यानंतर शिक्षणाचा दुसरा मार्ग नसल्यामुळे मी स्वत:हूनच परिचर्या सेवेत यायचे ठरवले. घरातून त्याला खूप विरोध झाला व नातेवाईकांच्या मदतीने मी नर्सिगचे शिक्षण घ्यायला आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला अहमदाबादला दीड वर्ष बंधपत्रित सेवा करून मी परत आले आणि १९६४ मध्ये ससूनमध्ये रुजू झाले. १९६६ मध्ये माझ्या दोन्ही मुली- एक चार वर्षांची आणि दुसरी एक वर्षांची गोवराने आजारी होत्या. मला ‘डय़ूटी’वर जाणे भाग होते. दोघी मुली केविलवाण्या चेहऱ्याने मला थांबवत होत्या. माझ्यातील आई जागी झाली आणि त्या दिवशी मी कामावर गेले नाही. दुसऱ्या दिवशी अर्थातच मला ‘या संसार कशाला करतात’, असे ऐकून घ्यावे लागले शिवाय रजाही बिनपगारी झाली. आम्ही सरकारी कर्मचारी असून आम्हाला रजेचे फायदे का नाहीत असे निवेदन मी दिले आणि मला त्या रजेचा पगार मिळाला. परिचारिकांना संघटना हवी या विचाराचं बीज तिथे पडले.
संघटनेचे सुरुवातीचे दिवस कसे होते?
– आम्हाला त्या वेळी अवघा १५९ रुपये पगार मिळत होता आणि त्यातून आमचे चाळीस रुपये उगाचच कापले जात. या मुद्दय़ावरून संघटनेची पहिली बैठक मी वैयक्तिकरीत्या घ्यायचे ठरवले. प्रचंड दडपणाखाली चाळीस परिचारिका त्या बैठकीस आल्या. तो दिवस होता २९ मार्च १९६६. तो चळवळीचा स्थापना दिवस. पुण्यात ‘इंटक’ संघटनेच्या उषाताई चौधरींकडून मला संघटनांच्या कामकाजाची माहिती मिळाली. पगारातून होणारी कपात रद्द करा, घरभाडे भत्ता सुरू करा अशा मागण्या आम्ही मांडल्या. परिचारिकांना दिवसाचे आठ तास आणि रात्रपाळीत १२ तासांचे काम असे आणि तिला तान्ही मुले असतील तर तिची अडचण व्हायची. १९६६ मध्ये तेव्हाचे आरोग्य मंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी ससूनमध्ये पाळणाघराला जागा देण्यासाठी प्रयत्न केले. ते पुण्यातील पहिले पाळणाघर ठरले. १९७५ मध्ये संघटनेला ‘महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन’ असे औपचारिक स्वरूप मिळाले. मी आणि मुंबईच्या कमल वायकोळे त्याच्या संस्थापक. संघटनेच्या उद्घाटनाला तत्कालीन आरोग्य मंत्री प्रतिभा पाटील आल्या आणि परिचारिकांच्या स्थितीच्या अभ्यासासाठी मोहिते समितीची स्थापना झाली. या समितीने चांगले काम केले पण त्यातील सूचना अमलात आल्या नाहीत. १९७९ साली मुख्यमंत्री शरद पवार यांनी आम्हाला कामाचे मर्यादित तास मिळावेत हे मान्य केले. अशी सुरुवात झाली आणि १९८० मध्ये संघटना सुवर्णपातळीवर पोचली होती.
आता परिचारिकांच्या मागण्या काय?
वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी परिचारिकांना बदामी रंगाचा गणवेश मिळण्याबाबत आमची चर्चा झाली होती आणि त्यांनी ते मान्यही केले होते. परंतु सात महिन्यांनंतरही तसे आदेश आले नाहीत. सार्वजनिक आरोग्य विभागात विनाकारण बदल्यांचा प्रश्न मोठा आहे. आपापसात बदली, विनंती बदली, प्रशासकीय कारणांसाठी केलेली बदली किंवा पदोन्नती बदली याला आमचा विरोध नाही. आमच्या हातात ना सत्ता ना अधिकार. मग उगाच बदल्या कशाला? चांगली क्लार्टर्स, मुलांच्या शाळांचे प्रवेश या सगळ्याच गोष्टींमध्ये बदली झालेल्या संसारी परिचारिकेला अडचणी येतात. तात्पुरत्या स्वरूपात करारबद्ध परिचारिकांची भरती होते, पण या मुलींना चांगला पगार नसतो, रजांचे फायदे नसतात. आरोग्य विभागात परिचारिकांची २००० पदे रिक्त असताना सरळ सेवेत भरती व्हावी आणि करारबद्ध परिचारिकांना त्यात सामावून घ्यावे अशी मागणी आहे. कामावर असताना परिचारिकांना सुरक्षिततेची हमी पाहिजे.
रुग्णसेवेच्या संदर्भातील लक्षात राहिलेला एखादा प्रसंग..
मी परिचारिका म्हणून नवीन असताना घटसर्प झालेले बाळ ससूनच्या बालरुग्णांच्या कक्षात आले होते. बाळाची परिस्थिती गंभीर होती आणि ९० बालकांच्या कक्षात आम्ही दोघीच परिचारिका. डॉक्टरांनी सांगिल्यानुसार मी रात्रभर सतत लक्ष देऊन त्या बाळाची काळजी घेतली. सकाळपर्यंत त्याची प्रकृती आश्चर्यकारकरीत्या सुधारली आणि बाळ वाचले. पुढे २५ वर्षांनी ग्रामीण भागातील एक जोडपे मला शोधत ससूनमध्ये आले. त्यांना माझे नावही आठवत नव्हते. पण अखेर त्यांनी मला शोधून काढले आणि हातावर लग्नाची पत्रिका ठेवली. इतक्या वर्षांपूर्वी मी घटसर्पामधून वाचवलेले ते बाळ- त्याचीच लग्नपत्रिका होती ती! ‘आम्ही खास तुमच्यासाठी बैलगाडी पाठवतो, तुम्ही आलेच पाहिजे,’ ते पालक आग्रह करत होते.असे प्रसंग प्रेरणा देणारे असतात.