‘महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन’च्या परिचारिका १५ जूनला एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत. मार्गदर्शक तत्त्वे डावलून विनाकारण परिचारिकांच्या बदल्या करू नयेत, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे.

या व इतर कारणांसाठी गेली दोन वर्षे या परिचारिकांनी संप केले होते. ‘शासनाने पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्या त्या वेळी संप मागे घेण्यात आला, परंतु आता पुन्हा मे २०१६ मध्ये मोठय़ा प्रमाणात परिचारिकांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत,’ असे संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. परिचारिकांना कारकुनी कामे न देता रुग्णसेवेचेच काम द्यावे, आश्वासनानुसार बदामी रंगाच्या गणवेशाविषयी आदेश काढावा, रिक्त पदे भरली जावीत आणि कामावर असताना महिला म्हणून सुरक्षितता मिळावी तसेच परिचर्या शिक्षणात प्रात्यक्षिकाला महत्त्व दिले जावे, या मागण्यांसह बंधपत्रित परिचारिकांचा प्रश्नही गुंतागुंतीचा असल्याचे संघटनेने म्हटले आहे.