“कुणालाही ओबीसीमधून आरक्षण दिलं जाणार नाही. असं अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस यांनी देखील ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी भूमिका मांडली आहे. मी देखील ओबीसाचा नेता म्हणून आमची भूमिका स्पष्ट करतो आहे की, ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये, ओबीसीच्या आरक्षणात कुणाचाही समावेश होता कामा नये. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होणारच नाही, प्रश्नच नाही.” असं राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

तसेच, “मला कळत नाही महाराष्ट्रावर अन्याय का होतो? मला न्यायालयाचा आदर आहेच. पण स्थगिती का मिळते हे कळत नाही. सर्वोच्च न्यायालय कुणाच्या इशाऱ्यावर चालतं का? असं कधी होतं का? हा प्रश्न निर्माण होतो. इतर राज्यांमध्ये ५० टक्क्यांच्यावर आरक्षण असताना स्थगिती मिळाली नाही, पण आपल्या वाट्याला हे दुर्देवं आलं आणि आरक्षणाला स्थगिती मिळाली व त्यातून अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला.” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

…तर भाजपा रस्त्यावर उतरेल, फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला इशारा

“ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी होणार नाही हे सरकारने आपल्या मंत्र्यांना सांगितलं पाहिजे. पण जर कोणी वाटेकरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरु, आम्ही मान्य करणार नाही,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सरकारला दिला होता.

तसेच, “एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय असताना दुसरीकडे ओबीसी समाजासंदर्भातही संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारमधील मंत्री मोर्चे कसे काढू शकतात? त्यांनी शपथ घेतली आहे. मोर्चा काढायचा असेल तर राजीनामा दिला पाहिजे. सरकारमधले मंत्रीच मोर्चे काढत असल्याचं पहिल्यांदा पाहतोय. हेच सरकारविरोधात मेळावे घेत आहे. ओबीसी आरक्षणात कोणालाही वाटेकरी करणार नाही हे सरकारने स्पष्ट सांगण्याची गरज आहे. मंत्र्यांनी हे मंत्रीमंडळात सांगायची गरज आहे आणि तसा ठराव घ्या. आम्ही मराठा आरक्षण करताना तशी तरतूद केली असून ओबीसीला संरक्षण दिलं आहे. सरकारी पक्षाच्या लोकांनीच दोन्ही भूमिका घेत तेढ निर्माण करणार असतील तर कायदा सुव्यवस्था कशी टीकेल?,” अशी विचारणा फडणवीसांनी केली होती.