कॉपर व ऑप्टिकल फायबरचे केबल टाकण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आकारण्यात येणारे रस्ते खुदाई शुल्क परवडत नसल्याबाबत बीएसएनएलकडून आक्षेप नोंदविण्यात येत आहे. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले आहे. याबाबतची माहिती बीएसएनएलच्या पुणे विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक एम. के. जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुण्यातील दर मर्यादित झाला, तरच दूरध्वनी संचाची व मोबाइलची संख्या वाढेल, असेही ते म्हणाले.
जैन यांनी सांगितले, की शहरामध्ये मोबाइलचे साडेचारशे टॉवर आहेत. मागणी लक्षात घेता आजून दीडशे टॉवर उभारावे लागणार आहेत. संपूर्ण जिल्ह्य़ामध्ये तब्बल एक हजार टॉवरची गरज आहे. लॅन्डलाइनसाठी केबल टाकाव्या लागतात. या केबल टाकण्यासाठी रनिंग मीटरसाठी बंगलोरमध्ये तीनशे रुपये दर आहे. मात्र पुणे पालिकेत सुमारे अडीच हजार रुपये दर आहे. पिंपरीत त्याहीपेक्षा अधिक दर आहे. हे शुल्क परवडणारे नाही. त्यामुळे नियोजित कामांवर परिणाम होतो आहे. पुणे शहरात तीनशे ठिकाणी केबल टाकण्याचे नियोजन आहे.