राज्य शासनाचे आदेश डावलून अकरावीच्या परीक्षा घेणाऱ्या तळेगाव येथील स्नेहवर्धक कनिष्ठ महाविद्यालयाच्या विरोधात तळेगाव पोलिसांनी शुक्रवारी (१२ जून) गुन्हा दाखल केला.

महाविद्यालयात अकरावी वाणिज्यच्या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसांची परीक्षा घेतली जात होती. गुरुवारी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोबाइलवर लघुसंदेश पाठवून बोलावून घेण्यात आले होते. त्यानुसार, विद्यार्थ्यांनी पेपर दिला. महाविद्यालयात नियम डावलून परीक्षा होत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार, शुक्रवारी दुसऱ्या दिवशी विद्यार्थी महाविद्यालयात आले आणि पेपर सुरू झाला. त्यानंतर पाळतीवर असलेले पोलीस तेथे दाखल झाले. तेव्हा २७ विद्यार्थी परीक्षा देताना दिसले.

शासकीय अधिकारी आणि पोलिसांनी वर्गातच विद्यार्थ्यांकडून सर्व माहिती घेतली. त्यानंतर महाविद्यालयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.

स्नेहवर्धक महाविद्यालयाच्या वतीने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून अकरावी वाणिज्यच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन पाहणी केली. त्यानुसार, महाविद्यालयावर पोलीस कारवाई करण्यात येत आहे.

– मधुसूदन बर्गे, तहसीलदार, मावळ