‘शादी डॉट कॉम’ च्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक करणाऱ्याविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पंकज महादेव जोशी (वय ३६, रा. सुयोजना हौसिंग सोसायटी, कोरेगाव पार्क) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला आणि पंकज यांची सप्टेंबर २००९ मध्ये शादी डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाली. गेल्या तीन वर्षांत त्यांच्या परिचयाचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. तिचा विश्वास संपादन करून पंकज याने गेल्या तीन वर्षांत गुडगाव, दिल्ली आणि हडपसर येथील मगरपट्टा सिटी येथे लग्नाचे आमिष दाखविले. ऑक्टोबर २०१२ पर्यंत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिने लग्नाची मागणी केली असता तिच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने लग्नास नकार देत फसवणूक केली. कोंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. जी. थोपटे पुढील तपास करीत आहेत.