कार्यालयातील तरुणीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने दोघांनी पेट्रोल टाकून जाळपोळ केली. सोमवार पेठेतील अशोका पॅव्हेलियन या व्यापारी संकुलात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी दोघांना गजाआड केले.
अब्दुल नबी शेख (वय २० रा. लुंबिनीनगर, ताडीवाला रस्ता) आणि नबी बाबाशाह नदाफ (वय १९ रा. नारंगी बाग, बोट क्लब रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सचिन विलास कांबळे (वय ३२, रा. अशोक सोसायटी, थेरगाव ) यांनी याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
डॉ. आंबेडकर रस्त्यावर अशोका पॅव्हेलियन संकुलात कांबळे यांचे कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालयात कामाला असणाऱ्या तरुणीची आरोपी शेख आणि नदाफ यांनी छेड काढली होती. कांबळे यांनी या दोघा आरोपींना याबाबत जाब विचारला. त्यामुळे शेख आणि नदाफ हे चिडले होते. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दोघे आरोपी कांबळे यांच्या कार्यालयात शिरले. पेट्रोलची बाटली ओतली आणि काडी पेटवून ते पसार झाले.
या घटनेत कार्यालयातील साहित्य पेटले. अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले, असे कांबळे यांनी फियादीत म्हटले आहे. कांबळे यांनी या दोघा आरोपींवर संशय व्यक्त केला. पसार झालेल्या शेख आणि नदाफ याला पोलिसांनी पकडले. सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार तपास करत आहेत. या दोघा आरोपींना न्यायालयाने २३ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी दिले.