पुण्यातील एखादी वैशिष्टय़पूर्ण बाजारपेठ कशी वसली, तयार झाली याचा वेध घेतला तर कित्येक वेळा आपण अचंबित होतो, चक्रावून जातो आणि कौतुकसुद्धा वाटते. अप्पा बळवंत चौकातील जुन्या पुस्तकांच्या बाजारपेठेत मला हाच प्रत्यय आला. शहराच्या मध्यावर, ऐन वर्दळीच्या चौकात हा व्यवसाय पूर्ण सामंजस्याने, विनातक्रार, प्रशासकीय चौकटी सांभाळून, मोठय़ा प्रतिष्ठेने पन्नास वर्षांहून अधिक काळ केला जात आहे.

अप्पा बळवंत चौक ते मजूर अड्डा हा सर्व परिसर पूर्वापार शैक्षणिक साहित्याची आणि पुस्तकांची बाजारपेठ म्हणून सर्वपरिचित आहे. याच बाजारपेठेच्या कुशीत, फुटपाथवर, आडोशाच्या जागी पुस्तक विक्रेते, जुन्या पुस्तकांच्या रचलेल्या थप्पीसह आपल्याला दिसतात. या व्यवसायाची सुरुवात कशी झाली हे जाणून घेणे इथे रंजक ठरेल. साधारण १९६२ सालची ही घटना आहे. मारुती पांडुरंग पोतदार हा पर्वती भागात राहणारा शालेय विद्यार्थी पुस्तके खरेदी करण्यासाठी अप्पा बळवंत चौकात आला होता. खिशात पंधरा रुपये आणि पुस्तकांची किंमत मात्र अठरा रुपये होती. सचिंत मनाने येरझाऱ्या घालणाऱ्या मारुतीला, त्याच वेळी फुटपाथवर एक विद्यार्थी त्याची जुनी पुस्तके विकण्यासाठी आलेला दिसला. दोघांच्या बोलाचालीतून मारुतीला हवी असलेली पुस्तके केवळ आठ रुपयांत मिळाली. या व्यवसायाची गरज आणि संभाव्य व्यापकता मारुतीने दूरदृष्टीने हेरली आणि आजच्या वैशिष्टय़पूर्ण बाजारपेठेचा तो मूल स्रोत ठरला. अधिकृत नोंदीनुसार सध्या या व्यवसायात ८५ विक्रेते असून, दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल होते.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

मारुती पोतदार हे कष्टकरी कुटुंबातीलच होते. स्वकष्टाने शिक्षण घेताना, आलेपाक, रद्दी विकणे, वृत्तपत्रांचे रतीब असे खटाटोप करताना आता पुस्तक विक्रीची जोड मिळाली. जुन्या शैक्षणिक पुस्तकांचा शोध घेणे, घरी संपूर्ण कुटुंबासोबत, रात्रं-दिवस दाभण, दोऱ्याने पुस्तके शिवून, खळ लावून, शुभ्र कव्हर लावायचे या कामात हाताची त्वचा सोलवटून निघायची. कष्टाची उपासना करताना, अप्रत्यक्षरीत्या या घराची सरस्वती आराधनासुद्धा चालू होती. निष्ठेने चालू असलेल्या या व्यवसायातून अनेक पुस्तक विक्रेते, प्रकाशक, लेखक, ग्राहक यांच्याशी परिचय वाढत गेला. अशा सर्वाची वर्दळ घरी सुरू झाली. गणरायावर नितांत श्रद्धा असलेल्या या माणसाचे, बुधवार चौकात स्वत:चे दुकान झाले. आता त्यांची कन्या सुरेखा हा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहे. या व्यवसायातील अनेकांच्या कथा थोडय़ाफार फरकाने अशाच आहेत. कालमानानुसार व्यवसायाचे स्वरूप, नव्या पिढय़ा आणि अभ्यासक्रमांबरोबर बदलत गेले तरी निष्ठेचा गाभा तोच टिकून आहे.

जुन्या पुस्तक विक्रेत्यांच्या, नवीन पिढीतील कार्यकर्त्यांनी दीर्घकालीन विचार करताना दूरदृष्टीने पाऊले उचलली. संघटना स्थापन करून, सभासदांच्या समस्या सोडवण्यासाठी पाऊले उचलली. विजय मरळ हे संघटनेचे अध्यक्ष असून, वसंत धामणे, सुरेश काळे, भगवान घोलप, बाळासाहेब थोरात, नंदू रहाटे, प्रफुल नाणेकर हे पदाधिकारी सहकारी आहेत. पोलीस प्रशासन पुणे मनपा, स्थानिक दुकानदार आणि फुटपाथवरील विक्रेते यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे कार्य संघटनेने केले. पालकमंत्री गिरीश बापट यांचे अनमोल सहकार्य असल्याची माहिती पदादिकाऱ्यांनी दिली. गरजू विद्यार्थी शोधून, त्यांना पुस्तके भेट दिली जातात. दिवाळीपूर्वी अनाथाश्रमातील मुलांना भेटवस्तू, फराळ, फटाके देणे, प्रतिवर्षी मान्यवरांचे सन्मान असे उपक्रम संघटनेतर्फे घेण्यात येतात. सभासदांच्या कौटुंबिक अडचणी, औषधोपचार, शैक्षणिक साहाय्य संघटनेतर्फे केल्याची माहिती मिळाली. फुटपाथवरील अशा व्यावसायिकांपैकी बहुतेकांची स्वत:च्या मालकांची घरे झाली असून, आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याकडे त्यांचा कल आहे. फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांपैकी सात जणांनी याच परिसरात स्वत:च्या मालकीची दुकाने थाटली आहेत. मनमोकळ्या गप्पा मारताना ही मंडळी म्हणाली, की उमेदवारीच्या काळात विवाहाचे वेळी सोयरिक जमवताना खूपच अडचणी आल्या. फुटपाथवरच्या व्यवसायाला मान सन्मान, प्रतिष्ठा अभावानेच मिळते. पण आम्ही जिद्द आणि निष्ठा सोडली नाही. आता आमची उच्च शिक्षण घेणारी मुले अभिमानाने या व्यवसायाचा उल्लेख करतात.

व्यवसायाच्या अर्थकारणाची थोडी माहिती घेणे इथे उचित ठरेल. लायब्ररी सिस्टममध्ये सभासद होणाऱ्या ग्राहकांची, सुस्थितीतील पुस्तके पुढील वर्षी ६० टक्के किमतीने खरेदी केली जातात. व्यवहारातील तारतम्याची उलाढाल जपणारे विद्यार्थी त्यांच्या मित्रांनासुद्धा कालांतराने सहभागी करून घेतात. नवीन पुस्तके विद्यार्थ्यांना २० ते २५ टक्के सवलतीने दिली जातात. खरेदी विक्रीच्या व्यवहारात १० ते १५ टक्के मार्जिनवर हा व्यवसाय चालतो. दर चार वषार्ंनी बदलणाऱ्या अभ्यासक्रमावर लक्ष ठेवावे लागते. कितीही काळजी घेतली तरी वार्षिक पुस्तके आऊट ऑफ सिलॅबस गेल्याने होणारे नुकसान, दरवर्षी १९ टक्के गृहीत असते. आधुनिक युगात ऑनलाईन खरेदीचे वाढते प्रमाण आणि त्यांच्याकडून प्रसंगी थेट विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या तीस ते चाळीस टक्के सवलतीमुळे मोठे आव्हान निर्माण झाले. परंतु नवनव्या अभ्यासक्रमांमुळे व्यवसायाची व्यापकतासुद्धा वाढते आहे, असे विजय मरळ यांनी सांगितले. पुण्याप्रमाणेच हा व्यवसाय सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, अहमदनगर येथे चालतो असे त्यांनी सांगितले.

पुण्यातील रस्त्यावरच्या सर्व व्यावसायिकांसाठी आदर्श उदाहरण ठरावे, असा हा व्यवसाय सुखेनैव चालू आहे. इथे सरस्वतीचे अधिष्ठान आहे, कष्टकऱ्यांना प्रतिष्ठा आहे, प्रशासनाची सुयोग्य साथ आहे आणि भवितव्याचा विचार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कुटुंबीयांनासुद्धा सार्थ अभिमान आहे. व्यवसाय जाणून घेतल्यावर मलासुद्धा या बाजारपेठेतील माणसांविषयी आत्मीयता वाटू लागली आहे.