करोना विषाणूमुळं अनेकांवर संकटं आली आहेत. अनेकांच्या नोकऱ्या ही गेल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये एका असहाय्य मुलाचा सांभाळ करणाऱ्या आजींना उदरनिर्वाहसाठी परिस्थितीशी झगडावं लागत आहे. लहान मुलांची मॉलिश करून महिन्याकाठी मिळणाऱ्या पैश्यातून त्या आपल्या अपंग मुलाचे पालन पोषण करीत होत्या. परंतू, करोनाचं संकट आलं आणि हातचं काम बंद झालं. यामुळे आर्थिक संकटात सापडल्या या माऊलीला मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागत आहे.

रुक्मिणी करोते (वय ६५) असे या आजीबाईंचे नाव असून त्यांचा मुलगा उमेश करोते (वय ४२) यांना आजारपणात एक पाय गमवावा लागला. पायाला गँगरिन झाल्यानं त्यांचा पाय गुडघ्यापासून वेगळा करावा लागला. उमेश हे सुरुवातीला किरकोळ आजाराने त्रस्त होते. मात्र, त्यानंतर पायाला जखम झाली आणि त्याच रुपांतर गँगरिन मध्ये झाल्यानं गुडघ्यापासून त्यांचा पाय वेगळा करावा लागला. अशा कठीण प्रसंगात उमेश यांच्या सोबतीला केवळ आई रुक्मिणी याच आहेत. गेल्या तीन वर्षापासून त्या स्वतः बाहेर काम करुन उमेश यांचा सांभाळ करीत आहेत. यासाठी लहान मुलांची मॉलिश करून महिन्याकाठी काही हजार रुपये ते मिळवतात. त्यातूनच मुलगा उमेश आणि त्यांचा उदरनिर्वाह चालतो. परंतू, अवघ्या जगावर घोंघावणाऱ्या करोना विषाणूने भारतात शिरकाव केला आणि त्याचं हातचं काम बंद झालं. या आजींना नातेवाईक, मुलगा आणि मुलगी असून एका मुलाची अशी बिकट अवस्था असताना ते त्यांना जवळ करीत नसल्याचं त्यांनी सांगितलं. वयाच्या ६५ व्या वर्षी मुलांसोबत दिवस काढण्याच्या वयात त्यांच्यावर आपल्या असहाय्य मुलाचा सांभाळ करण्याची वेळ आली आहे.

याबाबत रुक्मिणी करोते म्हणाल्या, “उमेश चांगला असता तर त्याने मला सांभाळलं असत पण त्याच्यावरच अशी परिस्थिती ओढवली आहे. या जगात आईशिवाय कोण कोणाचं नसतं. अशा परिस्थितीमुळे जवळचे सर्वजण दुरावले आहेत. उदरनिर्वाहासाठी लहान मुलांचे मॉलिश करण्याचं काम करायचे, पण करोनामुळे ते ही बंद झालं आहे.”

तर उमेश आपल्या आईच्या उपकाराची जाण ठेवत सांगतात की, “वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मी कंपनीमध्ये कामाला होतो. एकदा कामाला जात असताना अपघात झाला त्यात माझ्या खुब्यांना जबर मार लागला पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे नंतर पायाला जखम झाली यामुळे गँगरीन झालं आणि माझा पाय कापावा लागला. आता मला साधं पिण्यासाठी पाणी घ्यायचं असेल तर आईची वाट पहावी लागते. आईच आता माझ्यासाठी देव आहे.”