भडकलेल्या कांदा दरामुळे सामान्यांच्या डोळ्यात पाणी आले असताना गेल्या पंधरा दिवसांपासून कांदा दर नियंत्रणात येत आहेत. चांगले दर मिळण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणावर जुना  कांदा विक्रीस पाठविला जात आहे. दरम्यान, नवीन कांद्याचा हंगाम पुढील महिन्यात सुरू होणार असून हंगाम सुरू झाल्यानंतर दरात आणखी घट होईल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मार्केटयार्डातील कांदा-बटाटा विभागात रविवारी ९० ट्रक कांद्याची आवक झाली. त्यापैकी ७० ते ७५ ट्रक जुन्या कांद्याचे होते. आठवडय़ापूर्वी जुन्या कांद्याला दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतक ऱ्यांनी बाजारात मोठय़ा प्रमाणावर जुना कांदा विक्रीस पाठविला. जुन्या कांद्याची आवक वाढल्यानंतर घाऊक आणि किरकोळ बाजारात कांदा दरात घट झाली. नगरमधील श्रीगोंदा तसेच मध्यप्रदेशातून नवीन कांद्याची आवक झाली.

गेल्या आठवडय़ात चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याला घाऊक बाजारात दहा किलोमागे ५०० ते ५७० रुपये असे दर मिळाले होते. रविवारी आवक वाढल्यानंतर घाऊक बाजारात दहा किलो जुन्या कांद्याला ४५० ते ५०० रुपये असे दर मिळाले आहेत, असे मार्केटयार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

पंधरा दिवसानंतर जुन्या कांद्याचा हंगाम संपलेला असेल. साठवणुकीतील जुन्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर जुन्या कांद्याची आवक होत आहेत. पुढील महिन्यात ८ ते १० डिसेंबर दरम्यान जुन्या कांद्याचा हंगाम संपेल. त्यानंतर नवीन कांद्याचा हंगाम सुरू होईल. पुढील महिन्यात हलक्या प्रतीच्या जुन्या कांद्याची खरेदी करण्यापेक्षा ग्राहक चांगल्या प्रतीच्या वाळलेल्या नवीन कांद्याची खरेदी करण्यास प्राधान्य देतील. सध्या वाळलेल्या चांगल्या प्रतीच्या नवीन कांद्याची विक्री ३५० ते ४२० रुपये दराने विक्री केली जात आहे, असे पोमण यांनी नमूद केले.

नवीन कांद्याची प्रतीक्षा

गेल्या महिन्याभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन कांद्याचे मोठे नुकसान  झाले होते. त्यामुळे नवीन कांद्याचा हंगाम लांबणीवर तर पडलाच, मात्र कांदा रोपे शेतात वाहून गेली होती. अशा परिस्थितीत नवीन कांद्याची लागवड करण्यात आली. पावसाने उघडीप दिल्याने नवीन कांद्याची प्रतवारी सुधारली असून पुढील महिन्यात १५ डिसेंबरनंतर बाजारात सर्वत्र नवीन कांदा विक्रीस उपलब्ध होईल, असे कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

किरकोळ बाजारात एक किलो  कांद्याचे दर

* जुना कांदा- ६० ते ८० रुपये किलो

* नवीन कांदा- ४० ते ५० रुपये किलो